यवतमाळ : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातील निवड निर्देशक सल्लागार समिती सदस्य असल्याचे सांगून दोघांनी यवतमाळातील पाच जणांना ४७ लाखांचा गंडा घातला. विश्वास पटविण्यासाठी नागपुरातील पंचतारांकित हाॅटेलमध्ये बैठक लावली. नंतर पैसे घेऊन उडवाउडवीची उत्तरे सुरू केली. यातील एकाविरूद्ध २०२२ मध्येच फसवणुकीचा गुन्हा यवतमाळात नोंद आहे.
पर्यटन मंत्रालय निवड निर्देशक सल्लागार समिती सदस्य असल्याचे मीरा प्रकाश फडणवीस (रा. बालाजी सोसायटी, ज्येष्ठ नागरिक भवनसमोर, यवतमाळ) व त्यांचा साथीदार अनिरूद्ध आनंदकुमार होशिंग (३०, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) या दोघांनी यवतमाळातील सचिन अनिल धकाते (रा. प्रजापतीनगर) याची १९ लाखाने, चेतन भिसे (रा. कळंब) याची १ लाखाने, नीलिमा संजय मंत्री यांची १४ लाख, मंजुषा विजय पोटे यांची सात लाख, सरिता अशोक राठी यांची सहा लाख रुपयाने फसवणूक केली. याप्रकरणी सचिन धकातेच्या तक्रारीवरून संयुक्त गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चौघांकडून पर्यटन मंत्रालयांतर्गत खूप साऱ्या योजना आहेत. त्यात गुंतवणूक केल्यास महिन्याला पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न मिळते, अशी बतावणी आरोपींनी केली होती. या गुन्ह्यातील आरोपी अनिरूद्ध आनंदकुमार होशिंग याच्याविरूद्ध मार्च २०२२ मध्ये अवधूतवाडी पोलिस ठाण्यात याच पद्धतीने फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद आहे. हे मीरा फडणवीस यांना माहीत असतानाही त्यांनी ती माहिती लपवून ठेवली व ४७ लाखांनी फसवणूक केली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे यात पैसे गुंतविणारे सर्वच सुशिक्षित व उच्चभ्र कुटुंबातील सदस्य आहेत. आता या प्रकरणात पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्च २००२ मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी अनिरुद्ध होशिंग याच्या अटकेची कारवाई झाली नाही. तेव्हापासूनच हा आरोपी वॉन्टेड असताना आता दुसरा गुन्हा तिथेच नोंद झाला आहे.
रेल्वेत साहित्य पुरवठा करण्याचे काम
- गुंतवणूकदारांना पैसे गुंतविण्यासाठी रेल्वेत साहित्य पुरवठा करण्याचे काम असल्याचे सांगण्यात आले. याच्या निविदेतून मोठा परतावा मिळत असल्याचेही आमिष दाखविण्यात आले. यामध्ये रेल्वेत बेडशीट, ब्लॅंकेट पुरविणे तसेच इतर साफसफाईचे काम करणे, या सर्व कामांचे टेंडर निघणार आहे. त्यासाठी ३१ लाख रुपये सिक्युरिटी डिपाॅझिट मागण्यात आले होते. सर्वांकडूनच पैशांची अशा कारणाने उचल केली. काही दिवसात याचे ॲग्रीमेंट करून दिले जाईल, असेही सांगितले. विश्वास बसावा, यासाठी नागपूरमध्ये पंचतारांकित हाॅटेलात बैठक घेतली.