अविनाश साबापुरे / चैतन्य जाेशी
यवतमाळ / वर्धा : गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण विभागात प्रभारीराज सुरू असून खुद्द शिक्षणाधिकाऱ्यांचीच ८१ पदे रिक्त आहेत. आता यातील ४९ पदे बढतीद्वारे भरली जाणार आहेत. त्यासाठी निवड यादी तयार झाली असून शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पदोन्नतीस पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांकडून महसूल विभागाचे पसंतीक्रम तातडीने मागविले आहेत.
महाराष्ट्रात शिक्षणाधिकारी व तत्सम असंवर्गातील १४२ पदे मंजूर आहेत. मात्र त्यातील ८१ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी आता उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण मंडळात सहायक सचिव म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. आयुक्त स्तरावर अशा ४९ जणांची निवड यादी अंतिम झाली आहे. येत्या आठवडाभरात त्यांना नियुक्तीचे आदेश प्राप्त होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वी या कर्मचाऱ्यांकडून शालेय शिक्षण विभागाला बंधपत्र हवे आहे. त्यामुळे आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक श्रीराम पानझाडे यांनी बुधवारी तातडीने निवड यादीतील कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे बंधपत्र पाठविण्याचे निर्देश दिले.
कोणत्या महसुली विभागात बढतीनंतर नियुक्ती मिळावी याबाबतचा पसंतीक्रम बंधपत्रात नोंदवावा लागणार आहे. त्यामुळे पसंतीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. मात्र मागील वर्षाचे मालमत्ता व दायित्व विवरणपत्र सादर न केल्यास त्यांना बढतीला मुकावे लागणार आहे. या बढती प्रक्रियेमुळे अनेक जिल्ह्यांत प्रभारावर सुरू असलेला शिक्षण विभागाचा कारभार रुळावर येण्याची शक्यता आहे.
विदर्भात तब्बल १९ पदे रिक्त
राज्यात शिक्षणाधिकाऱ्यांची ८१ पदे रिक्त आहेत. त्यात विदर्भातील १९ पदांचा समावेश आहे. नागपूर ११ तर अमरावती महसुली विभागात ८ पदे रिक्त आहेत. याशिवाय पुणे १८, नाशिक ९, औरंगाबाद १८ तर कोकण विभागातही १७ पदे रिक्त आहेत. मात्र आता बढतीची संधी मिळणाऱ्या ४९ उपशिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांमध्ये विदर्भातील केवळ तिघांची नावे आहेत. त्यात कारंजाचे (वाशिम) गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, बुलडाणाचे उपशिक्षणाधिकारी किशोर पागाेरे व अमरावती विभागीय मंडळातील सहायक सचिव जयश्री राऊत यांचा समावेश आहे.