लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात शासकीय धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खुल्या बाजारात चढ्या दराने ब्रॅन्डेडच्या नावाखाली विकले जाणारे हे धान्य गरिबाच्या हक्काचे आहे. शासकीय धान्यावर प्रक्रिया करून ब्रॅन्ड म्हणून त्याची विक्री होते. याचा भंडाफाेड गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईतून झाला. तीन ठिकाणी धाडी घालत तब्बल ४९५ क्विंटल धान्य जप्त केले आहे. पुरवठा विभागाकडून नमुने घेण्यात आले आहे. नागपूर रोडवरील आरटीओ कार्यालयामागे धामणगाव येथून आलेला शासकीय धान्याचा ट्रक रिकामा होत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांच्या नेतृत्वात पथकाने धाड घातली. यावेळी पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे उपस्थित होते. तन्वीर शाह व मनोज जयस्वाल हे दोघे शासकीय धान्य उतरवित असल्याचे आढळून आले. तब्बल ९५ क्विंटल गहू त्या ठिकाणी सापडला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शासकीय धान्य राणीसती मंदिर परिसरातील कमला ट्रेडींग येथे पोहोचविले असल्याचे सांगण्यात आले. तसेच या ठिकाणी लागून असलेल्या भारत अग्रवाल यांच्याकडेही गहू टाकल्याचे तन्वीर शाह याने पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी कमला ट्रेडींग व भारत अग्रवाल यांच्या गोदामावर धाड घातली. तेथे शासकीय पोत्यांमध्ये धान्य भरुन असल्याचे आढळून आले. भारत अग्रवाल यांच्याकडेही शासकीय गव्हाचा मोठा साठा हाती लागला. तर श्यामसुंदर आनंदीलाल अग्रवाल यांच्या मालकीच्या कमला ट्रेडिंग कंपनीतही धान्य आढळून आले. याच ठिकाणी धान्यवर प्रक्रिया करण्याचा कारखाना चालविला जात होता. पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे यांनी येथील धान्याचे नमुने गोळा केले. हे धान्य तस्करीचे रॅकेट सर्वत्र फैलावले आहे. पोलिसांनी एकाच कारवाईत यातील तीन कड्या उघड केल्या. आता पुढील कारवाई पुरवठा विभागाच्या अहवालावर निश्चित केली जाणार आहे. कारवाईमध्ये सहायक निरीक्षक शुभांगी आगासे, पोलीस उपनिरीक्षक योगेश रंधे, कविश पाळेकर, विशाल भगत, गजानन डोंगरे, शेख सलमान आदींनी सहभाग घेतला.
शासकीय गोदामातून धान्य थेट तस्करांच्या गोदामात - धामणगाव रेल्वे स्टेशनवरील शासकीय गोदामातून निघालेले धान्य थेट तस्कराच्या गोदामावर पोहोचले. या धान्याच्या पोत्यांना शासकीय टॅग लागलेेले होते. भारत सरकारच्या सौजन्याने मध्य प्रदेश येथे पॅकिंग करण्यात आल्याची नोंद या धान्याच्या पोत्यावर होती. त्यावरूनच पुढील कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळावरून दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहे.