फोटो
उमरखेड : उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तत्काळ ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांच्या प्रयत्नातून विडूळ गटात विविध १२.४५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकनेते दिवंगत आमदार अनंतराव देवसरकर स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते येथील एका मंगल कार्यालयात गुरुवारी करण्यात आले. यावेळी उमरखेड आणि नांदेडचे नाते खूप जुने असून उमरखेडला विकासापासून वंचित ठेवणार नाही, याकरिता तत्काळ ५० कोटींचा निधी देण्याची ग्वाही ना. चव्हाण यांनी दिली. कामांचा प्रस्ताव प्रस्ताव पाठवा, आणखी निधी देऊ, निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहात मिर्झा होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमर राजुरकर, माजी खासदार सुभाष वानखेडे, प्रदेश सरचिटणीस तातू देशमुख, माजी आमदार विजय खडसे, महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष वनमाला राठोड, युवक काँग्रेसचे नेते जितेंद्र मोघे उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे, आपला जीन प्रेसचे अध्यक्ष आनंदराव कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे, महागावचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव सवनेेकर, शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, गोपाल अग्रवाल, रमेश चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविकातून राम देवसरकर यांनी उमरखेड, महागाव मतदारसंघामधील शेतकऱ्यांना नांदेड जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे पीक विमा मिळाला, त्याप्रमाणे लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. अचूक हवामान अंदाज सांगणारे पंजाबराव डक पाटील यांना शासकीय सेवेची संधी द्यावी, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाच हजार किलाेमीटरपैकी ३०० किमीचे रस्ते वाहून गेले. त्यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचीही मागणी केली. याप्रसंगी पाहुण्यांनी समयोचित विचार मांडले.
बॉक्स
वकील साहेबांच्या आठवणींना उजाळा
दिवंगत आमदार ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यक्रमात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ना. अशोक चव्हाण यांनी ‘वकील’ साहेबांसोबत असलेल्या त्यांच्या संबंधांचा उलगडा केला. त्यांनी दिवंगत ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या कार्याला उजाळा दिला.