यवतमाळ : नागपूर-तुळजापूर महामार्गालगतच्या तालुक्यातील एका गावात ५० वर्षीय इसमाने अवघ्या नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चिमुकली गुरुवारी सायंकाळी खेळून घराकडे जात होती. त्यावेळी आरोपी तुकाराम किसन सिंगाडे (५०) याने तिला ५० रुपये देण्याचे आमिष दाखविले. नंतर तिला राहत्या घरी किचनमध्ये घेऊन गेला. तेथे चिमुरडीवर अत्याचार केला. या घटनेनंतर भयभीत अवस्थेत घरी परतलेल्या चिमुरडीने आईला आपबीती सांगितली.
तिच्या आईने तत्काळ गुरुवारी रात्रीच आर्णी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गाव गाठून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भादंवि ३६६ अ, ३७६ अ, ब, ३७६ (२), जे ३७७ आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय नागेश जायले, जमादार भारती, अरुण पवार पुढील तपास करीत आहे.