ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेत यवतमाळ जिल्ह्यात ५०९० शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. लक्षांकापेक्षा अधिक शेततळे निर्माण करून यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या शेततळ्यांमुळे संरक्षित सिंचनात वाढ होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.
राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याने सिंचन क्रांतीकडे वाटचाल सुरू केली आहे.यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा. सिंचनाचे सात ते आठ टक्के जेमतेम क्षेत्र. उर्वरित ९२ टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून. त्यातही अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण कमी आणि अनिश्चित झाले. त्याचा परिणाम विपरित उत्पादनावर होऊ लागला. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढले तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, हेच हेरून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. शासनाने ७ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयाने ही योजना जिल्ह्यात सुरू केली. २४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यात केवळ १६४९ शेततळे पूर्ण झाले. मात्र जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्याचे सूत्र हाती घेतले आणि अवघ्या ९० दिवसात ३०१६ शेततळे पूर्ण केले. विशेष म्हणजे, जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचा लक्षांक असताना ५०९० शेततळे पूर्ण झाले.ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपाय योजले. महसूल आणि कृषी विभागात समन्वय निर्माण करून शेततळ्यासाठी नियोजन करण्यात आले. प्रसार माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करण्यात आली. लोक प्रतिनिधींचा सहभागही वाढविला. समूह पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले. एवढेच नाही तर दररोज सायंकाळी व्हॉटस्अॅप ग्रुप व ई-मेलद्वारे योजनेची प्रगती आणि अहवालाचे संकलन करण्यात आले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच जिल्ह्यात शेतशिवारात शेततळे निर्माण झाले. प्रशासकीय अधिकाऱ्याने मनावर घेतले तर योजना कशी यशस्वी होते, याचे हे उदाहरण ठरले आहे. विशेष म्हणजे, अल्पावधीत लक्षांक पूर्ण करून शेततळे निर्मितीत यवतमाळ जिल्ह्यात राज्यात अव्वल ठरला आहे.भूजल स्त्रोत वाढणारजिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे भूजल स्त्रोत वाढण्यास मदत होणार आहे. शेततळ्यांमुळे संरक्षित सिंचनाद्वारे जवळपास ५०९० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून रबीच्या क्षेत्रातही वाढ होणार आहे. भविष्यात पडलेला पाऊस जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविण्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी शेततळे ही योजना वरदान आहे. यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर सर्वप्रथम सिंचन क्षेत्र वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्यात जिल्ह्यात राबविण्यात आली. प्रत्येक विभागनिहाय बैठक घेऊन शेतकऱ्यांना शेततळ्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे लक्षांकापेक्षा अधिक शेततळे निर्माण झाले आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी निश्चितच होणार आहे.- डॉ.राजेश देशमुखजिल्हाधिकारी, यवतमाळ