यवतमाळ : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भरभक्कम असा परतावा मिळतो, असे आमिष दाखवून यवतमाळातील तब्बल नऊ जणांना एक कोटी ३८ लाखांनी गंडविणाऱ्या ठगबाजाचे अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत. त्याने मैत्रिणीवर चक्क ५२ लाख रुपये उडविले. ताज हॉटेल लखनऊ, रेडिसन ब्ल्यू हॉटेल नागपूर येथेही लाखोंच्या पार्ट्या त्याने केल्याची कबुली दिली.
अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (३०, रा. वाराणसी, उत्तरप्रदेश) असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने यवतमाळातील नऊ जणांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गंडविले. यात त्याला यवतमाळातील महादेवनगर येथे राहणाऱ्या मीरा फडणीस यांनी सहकार्य केले. नागपूर पोलिसांनी होशिंग याला शिताफीने अटक केली. त्यानंतर यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेने त्याला २९ ऑगस्ट रोजी प्रोड्युस वॉरंटवर ताब्यात घेतले.
सलग दहा दिवस पोलिस कोठडीत असलेल्या होशिंगकडून ठगविलेल्या रकमेचे काय केले, अशी विचारणा केली असता, याचे मजेदार कारनामे पुढे येऊ लागले आहे. अजूनही होशिंगकडून मोठी रक्कम परत मिळवायची आहे. शिवाय त्याची साथीदार मीरा फडणीस हिला न्यायालयाने दिलेला तात्पुरता जामीन रद्द करावा, यासाठी पोलिसांकडून न्यायालयात बाजू मांडली जाणार आहे. या गुन्ह्याचा तपास अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ईओडब्ल्यूचे सहायक निरीक्षक विशाल हिवरकर, जमादार मिलिंद गोफणे, सचिन पिंपळकर करीत आहेत.
हॉटेल, लॉजिंगमध्ये उडविला पैसा
अनेक उच्चभ्रू कुटुंबातील व्यक्तींना मोठ्या परताव्याचे आमिष देऊन होशिंग याने फसविले. त्यांच्याकडून लुबाडलेला पैसा बड्या हॉटेल व लॉजिंगमध्ये खर्च केला. लखनऊ येथील हॉटेल ताजचे ३४ लाखांचे बिल, रेडिसन ब्ल्यू नागपूर येथील हॉटेलचे ७२ लाखांचे बिल दिले.
मीरा फडणीसकडून सहा लाखांची जप्ती
मीरा फडणीस हिला ठगबाज होशिंग याने महागड्या भेटवस्तू दिल्या. यात डायमंड नेकलेस सेट, सोन्या-चांदीचे ताट, वाटी, सोन्याची चेन, मोबाइल, दुचाकी अशा वस्तू मीरा फडणीस हिला भेट दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या वस्तू जप्त केल्या आहेत. आणखी तपासासाठी होशिंग याच्या कोठडीची मागणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिस न्यायालयात करणार आहे.