पुसद (यवतमाळ) : रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून खाऊ घातल्यामुळे तब्बल ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. हा प्रकार तालुक्यातील हुडी येथील गिरधारी महाराज व्हीजेएनटी आश्रमशाळेत शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. सायंकाळी १२ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या आश्रमशाळेत एकंदर २७५ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यातील १५० मुले आणि १०० मुली असे २५० विद्यार्थी वसतिगृहात निवासी आहेत. विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास जेवण देण्यात आले. त्यानंतर अचानक मळमळ, उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ५४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. यात सात मुलींचा समावेश आहे.
बाधित सर्वांनी पुसद येथील दोन ते तीन खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली. अत्यवस्थ मुलांना आवश्यक उपचार देऊन दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनीसुद्धा या बाबीची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांची विचारपूस सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनीसुद्धा रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून दिल्याने अचानक तब्येत खराब झाल्याचे सांगितले. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली. अन्नातून विषबाधेचा प्रकार लक्षात येताच प्रशासनाचीही तारांबळ उडाली.
विषबाधेचा प्रकार लक्षात येताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसील प्रशासनाने हुडी येथील आश्रमशाळा गाठली. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही आश्रमशाळेत भेट दिली. तसेच रुग्णालयात पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना दिवसभर डाॅक्टरांच्या देखरेखीत ठेवल्यानंतर यातील बहुतांश विद्यार्थ्यांना सायंकाळी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, १२ विद्यार्थ्यांना अद्यापही सलाईन लावून रुग्णालयातच ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, आश्रमशाळेत घडलेल्या प्रकाराने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बिरसा ब्रिगेड आंदोलनाच्या पवित्र्यात
पुसद तालुक्यातील हुडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधेच्या गंभीर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आश्रमशाळा प्रशासनावर व हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
उपचारासाठी भरती केलेल्या मुला-मुलींची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. घटनेची माहिती यवतमाळ येथील समाजकल्याण सहायक आयुक्तांना दिली असून, लवकरच ते चौकशी करतील.
- महादेव जोरवार, तहसीलदार, पुसद
आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा हा प्रकार निदर्शनास आला. वसतिगृहात २५० विद्यार्थी आहेत. सकाळचे जेवण वसतिगृहात केल्यानंतर विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी त्यांना त्रास सुरू झाला. आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
- के.आर. डोरले, मुख्याध्यापक, हुडी