पारवात सर्वाधिक नुकसान : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी घाटंजी : गुरूवारी सायंकाळी झालेला वादळी वारा व गारपिटीच्या तडाख्यात तालुक्यातील अनेक घरांचे व शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ५५ गावांना क्षती पोहोचली आहे. सर्वाधिक नुकसान पारवा परिसरातील गावांचे झाले. दरम्यान, नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश आमदार राजू तोडसाम यांनी तालुका प्रशासनाला दिले. तहसीलदार हामंद, तालुका कृषी अधिकारी माळोदी, पंचायत समिती सभापती कालिंदी आत्राम, उपसभापती नीता जाधव, सदस्य नयना मुद्दलवार, गटविकास अधिकारी उत्तम मानकर, बाजार समिती उपसभापती अजय यल्टीवार, स्वप्नील मंगळे, गणेश चव्हाण, आकाश जाधव, पी.जी. रामगडे, जीवन मुद्दलवार आदींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पारवा भागातील यरंडगाव, कोपरी, डोर्ली, वाढोणा, मेजदा, जांब, पारवा, लिंगापूर आदी गावांना सर्वाधिक तडाखा बसला. अनेकांची घरे जमिनदोस्त झाली, घरावरील कवेलू फुटले, टीनपत्रे वाकली, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हरभरा, गहू, मिरची, ऊस आदी पिके जमिनीला झोपलीत. दरम्यान, आमदार तोडसाम यांनी प्रशासनाशी संपर्क करून आवश्यक त्या सूचना केल्या. जिल्हा परिषद सदस्य पावनी कल्यमवार, पंचायत समिती सदस्य सुहास पारवेकर, माजी पंचायत समिती सभापती रूपेश कल्यमवार, सचिन पारवेकर, संजय आरेवार, भास्कर इंगोले आदींनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)
घाटंजी तालुक्यातील ५५ गावे क्षतिग्रस्त
By admin | Published: March 18, 2017 12:50 AM