यवतमाळ : राज्य शासनाने एकाच टप्प्यात ५५ हजार शिक्षकांची पदे भरावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. ३) जिल्हा परिषदेवर अभियोग्यताधारकांचा महाआक्रोश मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातील डी.एड, बी.एडधारक बेरोजगार यवतमाळात एकवटणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परंतु, या रिक्त जागा भरण्याबाबत प्रशासनाच्या कुठल्याही हालचाली दिसून येत नाही. त्यातच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर शिक्षक भरतीबाबत संभ्रम निर्माण करणारी वक्तवे करीत असल्याने बेरोजगारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. राज्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यातल्या त्यात विषय शिक्षक उपलब्ध नसल्याने शिक्षणात अडथळे निर्माण होत आहे.
त्यातच फेब्रुवारी-मार्चमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी घेतल्यानंतरही भरतीसाठी कोणत्याही हालचाली नाहीत. पवित्र पोर्टल अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. आता लवकरात लवकर भरती करण्यात यावी तसेच ही भरती दोन टप्प्यात न करता एकाच टप्प्यात राज्यात ५५ हजार पदे भरण्यात यावी, अशा मागण्या अभियोग्यताधारक बेरोजगारांनी केल्या आहेत. या मागण्यासाठी सोमवारी मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता शिवाजी गार्डन येथून निघणार आहे. त्यानंतर हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकणार आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत धरणे देण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन प्रशांत मोटघरे, सचिन राऊत यांनी केले.