- पाणीपुरवठा योजना अपूर्ण, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव
पाणीपुरवठा योजना अपूर्णच : मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव
फोटो
ग्राउंड रिपोर्ट भाग १
मुकेश इंगोले
दारव्हा : येथील पालिकेत थेट नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेनेने नगर परिषदेत सत्ता स्थापन केली. गेल्या चार वर्षांत विकासकामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधीही मिळाला. परंतु तरीसुद्धा शहराचा अपेक्षित विकास साधता आला नसल्याचे बोलले जात आहे.
सत्ताधाऱ्यांना मागील कार्यकाळात रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेता आली नाही. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, योग्य नियोजनाअभावी खर्च करूनही शहरवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडले. त्यामुळे अद्यापही अनेक समस्या कायम आहेत.
राज्यात सत्ता, स्थानिक आमदार आणि नगर परिषदेवर झेंडा फडकल्यानंतर नागरिकांना विकासकामांच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळात रखडलेली ३४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या योजनेवर टीका करून सत्ता मिळविलेल्या शिवसेनेला चार वर्षांतही ही योजना पूर्णत्वास नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही भागांतील नागरिकांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
बॉक्स
मूलभूतऐवजी इतर कामांना प्राधान्य
विविध योजनेंतर्गत विकासकामांसाठी भरपूर निधी प्राप्त झाला. त्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली. परंतु विविध भागांतील समस्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे कामांचे नियोजन करणे आवश्यक असताना मूलभूतऐवजी इतर कामांना जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
बॉक्स
मुबलक शुध्द पाण्याची वानवा
नागरिकांना पक्के रस्ते, नाली, पथदिवे, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. पाणीपुरवठा योजना रेंगाळल्याने मुबलक व शुध्द पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
बॉक्स
पालिकेच्या उत्पन्न वाढीकडे दुर्लक्ष
नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी गेल्या चार वर्षांत फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. शहरात रस्त्यावरील अतिक्रमण, वाहन पार्किंग, मोकट जनावरांचा मुक्त संचार यासारख्या समस्या कायम आहेत.
बॉक्स
लेंडी नाल्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष
शहराला वेठीस धरणाऱ्या लेंडी नाल्याचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी याच नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले. तसेच रस्त्यावर कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते. वर्षभर नाल्यात घाण पाणी साचून राहते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचे प्रमाण वाढल्याने विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तरीसुद्धा या नाल्याची साफसफाई करून बांधकाम करण्यात आले नाही.
बॉक्स
रस्ते, नाल्यांची दुरवस्था
शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, गांधी ले-आऊट, बायपास परिसरातील काही नगरांसह जुन्या वसाहतीतील काही भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर काही परिसरात नाली बांधकाम झाले नसल्याने कच्च्या नाल्यातून सांडपाणी वाहून जात नाही. परिणामी ठिकठिकाणी घाण साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
280821\20210711_181709.jpg
१)शहरातील झालेल्या रस्त्यांची दुरावस्था
२)लेंडी नाल्यात याप्रमाणे झाडेझुडपे वाढली आहे