जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम : महसूल विभागाचीही मोहोरयवतमाळ : महसूल विभागाने यंदाच्या खरीप हंगामातील नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ६० टक्के घोषित झाल्याने सर्व सोळाही तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम असल्याचे मानले जात आहे. दरम्यान शासनाने पैसेवारी निश्चित करण्याची ही ब्रिटिशकालीन पद्धत बदलण्याची तयारी चालविली असून त्याचे निकषही बदलविले जाणार आहे. त्यानंतर मात्र पीक परिस्थितीचा अंदाजसुद्धा बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर या खरीप पिकाची एकूणच स्थिती उत्तम आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, महसूल विभाग यांनीसुद्धा पीक परिस्थिती चांगली असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीसुद्धा गेल्या पाच-दहा वर्षात पहिल्यांदाच एवढी चांगली पिके असल्याचे सांगितले आहे. त्यातच आता पावसाने दमदार हजेरी लावल्याने पीक परिस्थिती आणखी सुदृढ झाली आहे. दरम्यान महसूल प्रशासनाने आपली नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जुन्या नियमानुसार ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असेल तर ती पिके दुष्काळाचे संकेत देतात. परंतु जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ६० टक्क्यापेक्षा अधिक पीक आणेवारी जाहीर झाल्याने उत्तम पीक परिस्थितीवर महसूल प्रशासनाकडूनही शिक्कामोर्तब झाले आहे.पीक आणेवारी काढण्याच्या या ब्रिटीशकालीन पद्धतीला सुरुवातीपासूनच विरोध सुरू आहे. ही पद्धती बदलावी अशी मागणी आहे. त्याला प्रतिसाद देत आता युती शासनाने पीक आणेवारीची पद्धत आणि त्याचे निकष बदलण्याची तयारी चालविली आहे. त्यात उत्तम पीक आणेवारीसाठी ६७ टक्के हा निकष ठेवला गेला आहे. मात्र अद्याप त्यावर शासनाचे शिक्कामोर्तब झालेले नाही. आणेवारीची नवी पद्धत व नव्या निकषाबाबतची मार्गदर्शक तत्वे शासनाकडून आॅक्टोबरमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर वार्ताहर)
पैसेवारी ६० टक्के
By admin | Published: September 20, 2015 12:01 AM