पुसद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच आता ग्रामीण भागात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे बार उडणार आहे. तालुक्यातील मुदत संपलेल्या ६७ सहकारी संस्थांच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक नोव्हेंबरअखेरीस होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत तीन टप्प्यात या निवडणुका घेण्यात येणार आहे.सहकारी संस्थांच्या निवडणुका २०११-१२ पासून घेण्यात आल्या नाही. त्यामध्ये तालुक्यातील ६७ सहकारी संस्थांचा समावेश आहे. त्यात विविध कार्यकारी सहकारी संस्था, सहकारी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, पाणी वापर संस्था तथा मजूर, जंगल कामगार सहकारी संस्थांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निर्देश जारी केले आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात मार्च २०१३ अखेर निवडणुकीस पात्र ठरलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यात ३६ संस्थांचा समावेश आहे. डिसेंबर २०१४ अखेरीस निवडणूक पात्र संस्थांच्या निवडणुका दुसऱ्या ठप्प्यात होणार असून या संस्थांची संख्या २८ आहे. तिसऱ्या टप्प्यात जून २०१५ अखेर निवडणुकीस पात्र तीन संस्थांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी सहकार क्षेत्रातील दिग्गज सज्ज झाले आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकानंतर ग्रामीण भागात आता सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा आहे. (सांस्कृतिक प्रतिनिधी)
६७ सहकारी संस्थांची निवडणूक
By admin | Published: November 03, 2014 11:32 PM