दारव्हा : येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे मंगळवारी दोन केंद्रावर एनएमएमएस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना) परीक्षा घेण्यात आली. वीरजी भीमजी घेरवरा केंद्रावर ३८६ व नगर परिषद शाळा क्र. २ केंद्रावर ३०० अशा एकूण ६८६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
गटशिक्षणाधिकारी विलास जाधव यांनी कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरुवातीला दोन्ही केंद्रावरील बैठक व्यवस्थेची पाहणी केली. सामाजिक अंतर कशाप्रकारे राखल्या जाईल, याकरिता आवश्यक सूचना दिल्या. गटसमन्वयक तथा विस्तार अधिकारी गणेश निमकर यांनी एनएमएमएस परीक्षा कशी यशस्वी करता येईल, याकरिता आवश्यक सूचना पर्यवेक्षकांच्या सभेमध्ये दिल्या होत्या.
केंद्र प्रमुख संजय गडपायले, प्राचार्य सुरेश निमकर, मुख्याध्यापिका कल्पना धवने, पर्यवेक्षक दत्तात्रय कसंबे, पुरुषोत्तम सुरोशे आदी उपस्थित होते. प्राचार्य सुरेश निमकर यांनी पर्यवेक्षकांची कार्य समजावून सांगून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले. परीक्षा पर्यवेक्षक नेमणूक आदेश शिक्षक-शिक्षिकांना देण्यात आले. नगर परिषद शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक रमेश राठोड यांनी परीक्षेबाबत शिक्षकांना सूचना दिल्या. चांगली तयारी करण्यात आल्याने परीक्षा शांततेत पार पडली.