सरकारने शब्द फिरविला : सर्कलनिहाय मदतीत ५० टक्के कपातयवतमाळ : सततच्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली. यातच गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. विमा उतरविणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची तोकडी मदत मिळाली. याच सुमारास विमा न उतरविणारे शेतकरी मदतीस मुकले. अशा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० टक्के मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात केली होती. प्रत्यक्षात मंजूर विम्याच्या निकषाच्या ५० टक्केच मदत मिळणार आहे. राज्य शासनाने शब्द फिरविल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे.दुष्काळी स्थितीत राज्य शासनाने केलेली मदतीची घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक होती. असे असले तरी या घोषणेनंतर राज्य शासनाने सोयीनुसार मदतीचा शब्द फिरविला आहे. हेक्टरी मदत देताना जिरायती आणि बागायती असा फरक केला जातो. यासाठी ६ हजार ते २५ हजार रूपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. याला पर्याय म्हणून पीकविमा कंपनीने जाहीर केलेल्या मदतीच्या ५० टक्के मदत देण्याचे निकष राज्य शासनाने जाहीर केले आहेत. यातही सर्कलनिहाय मिळालेली मदत वेगवेगळी आहे. कुणाला १५० रूपये हेक्टरी मदतही दिली गेली आहे. याच्या निम्मी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही मदत एक ते दोन हेक्टरपर्यंतच मर्यादित आहे. यामुळे जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणेच शेतकऱ्यांना अत्यल्प मदत वितरित होणार आहे. (शहर वार्ताहर)
दोन लाख शेतकऱ्यांचे ७४ कोटी अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2016 12:53 AM