यवतमाळ : खासगी पतसंस्था व बँकांना रोख रकमेची वाहतूक करण्यासाठी आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाने नियम घालून दिले आहेत. त्या अधीन राहूनच व्यवहार करता येतात. यवतमाळातील तहसील चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका ऑटोतून रोख जात असल्याची माहिती मिळाली. सोमवारी सायंकाळी ५:०० वाजता हा ऑटोरिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतला. झडती घेतली असता त्यात रोख रक्कम आढळून आली.
एमएच २९ एम ७१५४ या काळ्या रंगाच्या ऑटो रिक्षातून लोखंडाच्या पेटीमधून ७५ लाखांची रोख नेली जात होती. यावेळी ऑटोत सुरेश निमजे, तुळशीदास खेकडे, आशिष जोग हे होते. एलसीबीच्या पथकाने संशयावरून हा ऑटो थांबविला. त्यांनी झडती घेतली असता रोख रक्कम आढळून आली. ऑटोतील तिघांनी ही रक्कम अकोला अर्बन बँक शाखा, जाजू चौक परिसर येथील असल्याचे सांगितले. रोख रकमेबाबतची सर्व कागदपत्र सोबत होती. मात्र, ज्या ऑटोरिक्षातून ही रोख नेली जात होती, तो ऑटो निवडणूक आयोगाच्या ॲपवर नोंदणीकृत नव्हता. या कारणास्तव भरारी पथकाने ही रोख रक्कम जप्त केली. बँकेचे नोंदणीकृत वाहन ऐनवेळी बिघडल्याने ऑटोरिक्षामधून रोख जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा करण्यासाठी नेली जात होती. दरम्यान, पोलिसांनी कारवाई केली. आता ही रक्कम निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ५०, १००, २०० आणि ५००च्या चलनी नोटांची बंडल आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, अमोल मुडे, सहायक फौजदार सय्यद साजीद, योगेश गटलेवार, बंडू डांगे, जमादार अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार, नीलेश राठोड, विनोद राठोड, रितुराज मेडवे, देवेंद्र होले, आकाश सूर्यवंशी यांनी केली.