लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या तब्बल ७६ शाळा पुढील शैक्षणिक सत्रापासून बंद होण्याचा धोका वाढला आहे. या शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी असल्याने त्या बंद पडण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या जवळपास २४२६ शाळा आहेत. यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या दोन हजार ३८ शाळा आहे. त्यात जवळपास एक लाख ४३ हजार २०० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सहावी ते आठवीपर्यंतच्या ३८८ शाळा असून त्यात ४५ हजार ७०० च्या आसपास विद्यार्थी शिकत आहे. या सर्व शाळांमध्ये एक लाख ८८ हजारांच्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात. तथापि आता ग्रामीण भागात इंग्रजीचे फॅड वाढत आहे. खेडोपाडी कॉन्व्हेन्ट संस्कृती उभी झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर विपरित परिणाम होत आहे.ग्रामीण भागात खासगी शाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषद शाळांना स्पर्धक निर्माण झाले. त्यात काही खासगी शाळांमध्ये थोड्या जादा सुविधा मिळत असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचा तिकडे कल वाढला. यामुळे जिल्हा परिषदेच्या ७६ शाळा बंद पडण्याचा धोका वाढला आहे. या शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी आहेत. पहिली ते पाचवीपर्यंतच्या या शाळा पुढील शैक्षणिक सत्रापासून बंद होण्याची भीती वर्तविली जात आहे. याशिवाय केवळ २० किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या २९२ शाळांवरही संक्रांत ओढवण्याची चिन्हे आहेत.गुणवत्ता सुधारणार कोण ?जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळत असल्याची सर्वत्र ओरड होत आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी कोण पुढाकार घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी संख्या घटत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. तरीही शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या ७६ शाळांवर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:33 PM
जिल्हा परिषदेच्या तब्बल ७६ शाळा पुढील शैक्षणिक सत्रापासून बंद होण्याचा धोका वाढला आहे. या शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी असल्याने त्या बंद पडण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देदहाच विद्यार्थी : २९२ शाळांमध्ये पटसंख्या कमी, पुढील शैक्षणिक सत्रात बंदची भीती