महागाव : तालुक्यात गेल्या २४ तासापासून संततधार पाऊस कोसळत आहेत. त्यामुळे लाहेअर पूस प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
१५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला होता. सोयाबीन व अन्य पीक परिस्थिती धोक्यात आली होती. मात्र, १६ ऑगस्टपासून तालुक्यात संततधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी तालुक्यातील गुंज ते पुसद, माहूर मार्ग वळण रस्त्यावर बांधलेला पूल तुटल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. १ जूनपासून आत्तापर्यंत ७०२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
काळी दौ. मंडळात ५० हेक्टर नुकसानीचा अहवाल मंडळ आधिकारी संजीव रोहणकर यांनी सादर केला आहे. सर्वाधिक नुकसान फुलसावंगी मंडळात झाले आहे. महागाव येथून अवघ्या ११ किमी अंतरावर असलेल्या वेणी धरण लोअर प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा आहे. या धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भाऊ अंबिलवादे यांनी दिली.
पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस कोसळल्यास आणखी दोन दरवाजे उघडण्यात येतील. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
बॉक्स
तालुक्यातील फुलसावंगी मंडळातील शिरपुली येथील नाल्या काठावरील शेतकरी निखिल मोरतकर, आदीनाथ चौधरी, दत्ता गावंडे, बालू गावंडे, दत्ता वाठोरे, गजानन सूर्यवंशी, प्रकाश मोरतकर, बाबाराव मोरतकर, गजानन उबाळे, श्रीकांत मोरतकर, अजाबराव उबाळे, संदीप मोरतकर, धुळबा आमले, जेवणतराव साखरे, संतोष महाले, नितीन भोयर, दगडू पांडे, विकास पोटे, संभाजी पोटे, कैलास पोटे, शिवाजी पोटे, शंकर आढाव यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले आहे.
कोट
पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तालाठी, मंडळ अधिकाऱ्यांना सकाळीच रवाना केले.
विश्वंभर राणे, प्रभारी तहसीलदार, महागाव