विज्ञान, गणिताचे समुपदेशन : आक्षेप घेता येणार, यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात यवतमाळ : जिल्हा परिषदेने सामाजिक शास्त्र आणि मराठी विषय शिक्षकांच्या समुपदेशनाने जागा भरल्या. आता गणित आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांना समुपदेशनाव्दारे नियुक्ती दिली जाणार आहे. समुपदेशनासाठी शनिवार आणि रविवारी जिल्हा परिषदेत शिक्षकांची जत्रा भरली होती. रात्री उशीरापर्यंत समुपदेशन सुरू होते. यात पदवीधर शिक्षकांची विषय शिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली. दोन दिवस भाषा विषयाचे ४३६, समाजशास्त्राच्या ३१४ शिक्षकांना समुपदेशनाव्दारे नियुक्ती दिली गेली. आता गणीत आणि विज्ञान शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ८०८ शिक्षकांना ही नियुक्ती मिळणार आहे. यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या दोन दिवसांत ती प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर शिक्षकांना आक्षेपही घेता येणार आहे. जिल्ह्यात गणित आणि विज्ञान विषय शिक्षकांच्या ८०८ जागा मंजूर आहे. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेकडे तेवढे गणीत व विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षकच नाही. त्यामुळे प्रथम बीएससी शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे. नंतर बारावी विज्ञान डीएड शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
८०८ जागा मंजूर अन् ७५ शिक्षक उपलब्ध
By admin | Published: April 19, 2017 1:25 AM