मुुद्रा लोन मिळेना : पंतप्रधान स्वयंरोजगार कार्यालयाने केले हात वर यवतमाळ : नोकरीची प्रतीक्षेत असलेल्या ८३ हजार युवकांनी स्वयंरोजगाराकडे आपला मोर्चा वळविला आहे. नोकरीची अपेक्षा सोडून उद्योजक होण्यास तयार असलेल्या ८३ हजार युवकांना रोजगार हवा आहे. तर दुसरीकडे ज्या आर्थिक ताकदीवर युवकांनी आपल्या उद्योगाचा डोलार उभा करण्याचे ठरविले होते, त्याच कार्यालयाकडे छदामही राहिला नाही. यामुळे पंतप्रधान रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाने सावध पवित्रा घेत रोजगाराबाबत हात वर केले आहे. यामुळे उद्योजक होण्यास इच्छूक असणाऱ्या तरूणांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे. युवा उद्योजकांना रोजगार उभा करताना कुठलीही आर्थिक अडचण भासू नये म्हणून पंतप्रधान रोजगार स्वयंरोजगार योजना यूपीए सरकाराच्या काळात हाती घेण्यात आली. या योजनेतून युवकांना उद्योग उभारण्यासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज अनुदानावर दिले जात होते. नवीन सरकार येताच या योजनेतील निधी बंद करण्यात आला. यामुळे उद्योगासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून, असा गंभीर प्रश्न युवकांपुढे निर्माण झाला आहे.यामध्ये १० वीपर्यंत शिक्षण झालेले २८ हजार ९८७ युवक, १२ वीपर्यंत शिक्षण घेणारे २६ हजार ८३५ युवक, डिप्लोमाधारक १४८५ युवक, बीएडधारक २२१५ युवक, आयटीआयधारक पाच हजार १८५ युुवक, यासोेबतच पदवी आणि विविध क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या युवक आणि युवतींचा समावेश आहे. मात्र त्यांनी रोजगार उभा करण्यासाठी पाऊल उचलले असले, तरी आर्थिक अडचणी उभ्या झाल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयाने हात वर केल्याने अधिकच अडचणी वाढविल्या आहेत. गत वर्षभरापासून या कार्यालयाकडे कर्जवाटपाचे उद्दिष्टच आले नाही. परंतु, रोजगार उभारण्यास इच्छूक असणाऱ्या युवकांच्या अर्जाचा खच दिवसेन्दिवस वाढतच चालला आहे. यामुळे रोजगार स्वयंरोजगार कार्यालयात डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात बेरोजगार स्वतंत्र उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात बँकाही अडसर ठरत असल्याने अनेक तरुणांचे उद्योजक होण्याचे स्वप्न भंग पावत असल्याचे दिसत आहे. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यातील ८३ हजार युवक स्वयंरोजगाराच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 14, 2016 2:38 AM