यवतमाळ : शुक्रवारी जिल्ह्यातील सात बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली. १२६ जागेसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना निवडून देण्यासाठी ९५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गावापासून मतदान केंद्रापर्यंत मतदारांना खेचून आणण्याचे काम प्रत्येक पक्षाने पार पाडले. यामुळे वाहने भरून मतदार मतदान केंद्रावर येत होते. मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानामुळे प्रत्येक पक्ष विजयाचे गणित मांडताना दिसत आहे.
यवतमाळ, दिग्रस, नेर, बाभूळगाव, वणी, पुसद आणि महागाव बाजार समितीमध्ये मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी ८ पासून दुपारी ४ पर्यंत मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी होती. या ठिकाणी वाहनाच्या माध्यमातून मतदार पोहोचत होते. शुक्रवारी दिवसभर वातावरण स्वच्छ असल्याने मतदानात कुठलाही अडथळा आला नाही. सर्वाधिक ९७ टक्के मतदान दिग्रस आणि बाभूळगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात पार पडले.
५४ मतदान केंद्रावर सायंकाळपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. मतदान केंद्राबाहेर असलेल्या बुथवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सायंकाळी ४ पर्यंत मतदारांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी अडते, हमाल मापारी मतदार संघ, या सर्वच मतदार संघात मोठ्या प्रमाणात मतदान झाले.
सर्वच पक्षांना विजयाचा विश्वास
बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आणि विरोधी गटातील सदस्यांसह अपक्ष उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोनही गटांनी विजयी उमेदवार म्हणून आमचाच उमेदवार राहणार असल्याचा विश्वास मतदारांनी नंतर व्यक्त केला.
मतमोजणी प्रक्रिया सुरू
जिल्ह्यातील ७ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करताना सुरक्षा यंत्रणा चोख ठेवण्यात आली होती. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मतपेट्या गोळा झाल्यानंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होती.
असे झाले मतदान
१२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ५४ टक्के मतदान पार पडले. २ पर्यंत ७४ टक्के मतदानाची नोंद झाली. तर ४ पर्यंत शेवटच्या टप्प्यात ९५ टक्के मतदान पार पडले.
बाजार समिती, एकूण मतदान, टक्केवारीयवतमाळ ,१५४२, ९६.७९ टक्केदिग्रस, ९८८,९७ टक्केनेर, १२९८, ९६ टक्केबाभूळगाव, १०६२, ९७ टक्केवणी, १७४४, ९४ टक्केपुसद,१५४५, ९४ टक्केमहागाव, १५१५, ९१ टक्केएकूण, ९६९४, ९५ टक्के
सेवा सोसायटी गटात सर्वाधिक मतदान
विविध गटामध्ये घेण्यात आलेल्या या मतदानात सर्वाधिक ९७ टक्के मतदान सेवा सहकारी संस्थात पार पडले. ग्रामपंचायत मतदार संघात ९४ टक्के मतदान झाले. व्यापारी अडते गटात ९६ टक्के मतदान झाले. हमाल, मापारी मतदार संघात ९० टक्के मतदान पार पडले.