यवतमाळ : विना क्रमांकाची बुलेट विकण्यासाठी एक जण पुसदमधील वाशिम रोड येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खातरजमा करून त्याला पकडण्यासाठी ते जाताच सदर इसम पळू लागला. पथकाने ताब्यात घेवून विचारपूस केली असता तो दुचाकीचोर निघाला. पोलिसांनी त्याच्याकडून पाच बुलेटसह एकूण नऊ मोटारसायकली हस्तगत केल्या. ही कारवाई भोजला फाट्यावर शनिवारी करण्यात आली.
करण रमेश शिंदे (२३, रा. अंबाभवानी नगर, जि. परभणी) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. त्याने विक्रीसाठी आणलेली बुलेट मोटारसायकल शिवाजी शाळा पुसद येथून चोरल्याची कबुली दिली. या मोटारसायकल चोरीप्रकरणी पुसद ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. अधिक विचारपूस केल्यानंतर या भामट्याने मागील दीड वर्षांत पुसद, दिग्रस, खंडाळा, परभणी व आदिलाबाद (तेलंगाणा) येथून त्याचा साथीदार अनिल सोळंके (२२, रा. महागाव) याच्या मदतीने मोटारसायकली चोरून त्या अवतारसिंग जंगूसिंग जुनी (रा. जनकापूर, ता. नागभिड, जि. चंद्रपूर) यास विक्री केल्याचे सांगितले. पथकाने आरोपी करण शिंदेसह जनकापूर येथे जावून अवतारसिंगला ताब्यात घेतले.
त्याच्याजवळ चोरीच्या आठ मोटारसायकली आढळून आल्या. याप्रकरणी सात लाख ५० हजार रुपये किमतीच्या नऊ मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. यावेळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पकडलेल्या दोन आरोपींना दिग्रस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अनिल सोळंके याचा पथक शोध घेत आहे. ही कारवाई सपोनि गजानन गजभारे, अमोल सांगळे, पोलिस उपनिरीक्षक रेवन जागृत, पोलिस अंमलदार तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंढोकार, पंकज पातुरकर, बबलू चव्हाण, सुनील पंडागळे, किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर, अमित कुमरे आदींच्या पथकाने पार पाडली.