यवतमाळ :शेतकरी आणि संकटांची मालिका एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,असे म्हणण्याची वेळ यावर्षी शेतकऱ्यांवर आली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेली संकटांची मालिका ऑक्टोबर महिना आला तरी पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन आणि शेतमालाच्या घसरलेल्या दराने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांपुढील संकटांच्या मालिकांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.
दिवसेंदिवस शेतीचे गणित बिकट होत आहे. निसर्ग प्रकोप आणि वाढत्या महागाईने शेतकरी बेजार झाले आहेत. त्यातच शेतमालाचे दर घसरल्याने हवालदिल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी सात हजार रुपयेे क्विंटल असलेले सोयाबीनचे दर आता ४४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कापसाचे दरही असेच गडगडले आहेत.
यावर्षी १४ हजार रुपये क्विंटल दर कापसाला मिळेल,अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात कापसाचे दर आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहे. कळंबमध्ये कापसाच्या शुभारंभाला हे दर मिळाले आहेत. यामध्ये पूर्वीच्या दराच्या तुलनेत निम्मी घट नोंदविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे दिवाळे
शेतमालाचे दर पाहून शेतकऱ्यांची हिम्मत वाढली होती. त्यामुळे त्यांनी शेतीवर मोठा खर्च केला. खते,बियाणे, कीटकनाशकांच्या किमती वधारल्या असतानाही शेतकऱ्यांनी चालढकल केली नाही. सोयाबीनला मिळालेल्या दराने बियाणे कंपन्यांनी बॅगचे दर वाढविले. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मजुरी दरावर ही झाला. सोयाबीनची बॅग काढण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपयांचा दर आहे. त्यात सोयाबीन किती निघेल याचा अंदाज नाही.
बोनस दिला तरच शेतकरी तरतील
खर्च आणि नैसर्गिक आपत्ती पाहता कापूस दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस हवा आहे. साखर निर्यातीला सबसिडी मिळते. मात्र,सोयाबीन निर्यातीला सरकार सबसिडी देत नाही. कापसाच्या निर्यातीला सबसिडी हवी,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
विनामूल्य आयात धोरणाचा फटका
सोयाबीन आणि सोयापेंडचे विनामूल्य आयात धोरण शेतकऱ्यांना महागात पडले आहे. महागाई कमी करण्याच्या नावाखाली आयात होत आहे. त्याचा फटका थेट शेतमालावर पडत आहे. दरात घसरण झाली आहे. राज्यात सोयाबीनचे उत्पन्न घटणार असले तरी इतर ठिकाणी उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रारंभी सोयाबीनचा दर दबावात राहणार आहे. मात्र,नंतरच्या काळात दर वाढण्याचा अंदाज आहे.
जागतिक बाजारात कापसाचे दर उतरले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ६० ते ६५ हजार रुपये खंडीचे दर आहेत. गतवर्षी एक लाख रुपये खंडीपर्यंत रुईचे दर होते. गतवर्षी एक्सपोर्ट झाले. सोयाबीनची ढेप आयात झाली नाही. सोयाबीन इंडस्ट्रीजने आयात करण्यास नकार दिला. आता आयात शुल्क शून्य झाले.
- विजय जावंधिया, शेतकरी अभ्यासक