लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्युत कंपनीला दाखल केलेले प्रकरण ७८ वर्षीय ग्राहकाने स्वत: लढले. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगासमोर या व्यक्तीने आपली बाजू मांडली. आयोगाने त्यांच्या बाजूने निर्णय देत विद्युत कंपनीला चपराक दिली.
यवतमाळच्या समर्थवाडीतील प्रभाकर रामचंद्रजी हजारे असे या खटला लढणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ऑगस्ट २०१९मध्ये आलेल्या बिलाचा भरणा त्यांनी मुदतीच्या आत केला. परंतु, पुढील महिन्यात आलेल्या बिलात थकबाकी दर्शविण्यात आली. याप्रकरणी हजारे यांनी ग्राहक आयोगात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी घेत दोन देयकाची एकूण रक्कम ८ हजार ५२ रुपये त्यांना नऊ टक्के व्याजासह परत करावी, असा आदेश देण्यात आला. शिवाय, शारीरिक व मानसिक त्रासापोटी अनुक्रमे तीन हजार आणि दोन हजार रुपये भरपाई द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे.