यवतमाळ : शेताजवळून पाणंद रस्ता सुरू करून त्याचे बांधकाम करताना अडथळा न आणणे, तसेच देयक वेळेवर काढण्यासाठी चक्क दीड लाख रुपयांची लाच मागितली. हा प्रकार दारव्हा तालुक्यातील वरुडखेड गटग्रामपंचायतीमध्ये घडला. सरपंच, उपसरपंचासह पाचजणांवर एसीबीने गुन्हा दाखल केला. दीड लाखापैकी अर्धी रक्कम ७५ हजार रुपये शनिवारी दुपारी बोदेगाव येथे हार्डवेअर दुकानात स्वीकारले.
सरपंच नीलेश प्रकाश राऊत (वय ३५), उपसरपंच गजानन तुळशीराम मनवर (४०), रमेश आनंदराव कुटे (६२, तिघे रा. वरुडखेड), मुकुल घनश्याम राऊत (२८, रा. कारंजा लाड), घनश्याम बाबाराव राऊत (रा. कारंजा लाड) असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. एसीबीकडे तक्रारदार ३ जूनला पोहोचला. एसीबीच्या पथकाने त्याच्या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर लाच देण्यासाठी तक्रारदाराने नीलेश राऊत याच्यासह पाचजणांसोबत तडजोड केली. लाचेपैकी अर्धी रक्कम ७५ हजार ८ जूनला घेण्याचे आरोपीने मान्य केले. एसीबी पथकाने बोदेगाव येथील गौरी हार्डवेअर येथे सापळा लावला.
सरपंच, उपसरपंच यांच्या सांगण्यावरून हार्डवेअर चालक मुकुल राऊत याने एसीबी पथकासमक्ष ७५ हजारांची लाच घेतली. त्यानंतर एसीबीचे पोलिस निरीक्षक अमित वानखडे यांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी भष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास एसीबीचे पथक करीत आहे. या कारवाईने मात्र वरुड व बोदेगाव येथे एकच खळबळ उडाली आहे.