संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ): गुरूवारी सायंकाळी रांगणा भुरकी शिवारात शेतात काम करीत असलेल्या अभय मोहन देऊळकर या २३ वर्षीय युवकावर वाघाने अचानक हल्ला करून त्याला ठार मारले. गेल्या अनेक वर्षात या भागात पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेमुळे पंचक्रोशीत वाघाची दहशत निर्माण आहे. त्यातच वाघांचे वेगवेगळे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असल्याने दहशतीत भर पडली आहे.
वणी तालुक्याच्या सभोवताल आठपेक्षा अधिक वाघांचा मुक्तवावर आहे. दररोज कुठे ना कुठे व्याघ्रदर्शन होत आहे. याचा परिणाम शेतीकामावर होत आहे. ज्या भागात वाघ दिसतो, त्या भागातील शेतकरी, शेतमजूर शेतात जायला घाबरत आहेत. वन विभागाकडून तसा अलर्टही देण्यात आला आहे. यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोन या गावाच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून व्याघ्रदर्शन होत आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी वणी येथील वनविभागाचे पथक कोना येथे जाऊन आले. रांगणा-भुरकी शिवारात तरूणावर हल्ला करणारा हा तोच वाघ असावा, अशी वनविभागाला शंका आहे. मात्र हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यात निघून गेल्याचा अंदाज बांधला जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वणी-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वर्धा नदी वाहते. या भागात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी आहेत. खाण परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. त्यामुळे वाघासह अन्य वन्यजीवदेखील या परिसरात भटकत आहेत. वाघाचा भ्रमण मार्ग असल्याने अनेकदा ताडोबातील वाघ वर्धा नदीचे पात्र ओलांडून वणी तालुक्यात प्रवेश करतात. दोन दिवसांपूर्वी बोर्डा परिसरातदेखील वाघ दिसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने तेथे जाऊन नागरिकांना अलर्ट केले. वाघांच्या दहशतीमुळे रबीचा हंगाम प्रभावित होत आहे.
त्या व्हिडीओंबाबत वनविभाग संभ्रमात
रांगणा-भुरकी शिवारात व्याघ्र हल्ल्याची घटना घडल्यानंतर वाघाबाबत प्रचंड दहशत निर्माण झाली. तीन दिवसांपूर्वी वणी-वरोरा मार्गावरील गुजच्या मारोतीजवळ असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात रस्त्याने जात असलेला वाघ कैद झाला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. मात्र या व्हिडीओबाबत वन विभागाला विचारणा केली असता, व्हिडीओमध्ये दिसणारा प्राणी वाघच आहे का, याबाबत संभ्रम असल्याचे सांगण्यात आले.