- सुरेंद्र राऊत
यवतमाळ - शहरातील रस्त्याचे खोदकाम करताना रितसर नगरपरिषदेची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशी कुठलीही परवानगी न घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेने पाईपचे लिकेज काढण्यासाठी शनिवारी दुपारी खोदकाम सुरू केले. हा प्रकार नगरपरिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी थेट कठोर कारवाई केली. या संदर्भात मजीप्राचे कार्यकारी अभियंता यांच्यासह पाचजणाविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेची नुकसान केल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे, कर्मचारी रामाजी खोब्रागडे, कंत्राटदार नालमवार, विनोद दत्ताजी कांबळे, जेसीबी चालक प्रफुल दुर्वास पाटील या पाचजणाविरोधात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम ३ भारतीय दंडसंहिता कलम ४२७ आणि सहकलम ३४ नुसार गुन्हा नोंद झाला आहे. याची तक्रार मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यातर्फे साजीद वजीर शेख यांनी यवतमाळ शहर पोलिसात दिली. शहरासाठी अमृत याेजनेतून वाढीव पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम करण्यात आले. यात संपूर्ण शहरातील रस्त्यावर खाेदकाम झाले. सलग चार वर्षांपासून या खाेदकामुळे यवतमाळकर जनता त्रस्त झाली आहे. मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. नवीन पाइपलाइन ठिकठिकाणी लिक हाेत आहे.
जीवन प्राधिकरणाच्या निकृष्ट कामाचा फटका सर्वांनाच बसत आहे. पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असे सांगण्यात आल्यानंतर नगरपरिषदेने रस्त्याची दुरुस्ती केली. अनेक रस्ते नव्याने तयार करण्यात आले आहेत. आता या रस्त्यावर लिकेज काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाची यंत्रणा काम करत आहे. यासाठी नगरपरिषदेची रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. शिवाय खाेदकामात क्षतिग्रस्त झालेला रस्ता दुरुस्त करण्यासाठी त्याचे पैसे नगरपरिषदेकडे जमा करावे लागतात. अशी काेणतीच प्रक्रिया जीवन प्राधिकरणकडून हाेताना दिसत नाही.
मेडिकल चाैक ते नंदूरकर विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्राधिकरणाची यंत्रणा लिकेज काढण्यासाठी खाेदकाम करत हाेती. शनिवारी दुपारी हा प्रकार तेथून जाताना मुख्याधिकारी दादाराव डाेल्हारकर यांना दिसला. काेणतीच परवानगी न घेता, हे काम सुरू असल्याचे निर्दशनास आले. त्यांनी तत्काळ खाेदकामाचा पंचनामा करून जेसीबी जप्त केला. यापूर्वी सुध्दा जीवन प्राधिकरणाने धामणगाव मार्गावर, चांदणी चाैक परिसर, दर्डानगर भागात नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर खाेदकाम केले आहे.
जीवन प्राधिकरणाने खाेदकाम करण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. मनमानी पद्धतीने चांगल्या रस्त्यावर खोदकाम करणे नियमानुसार नाही. पालिका रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा व रस्त्याची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करीत असताना प्राधिकरणाच्या यंत्रणेनेही जबाबदारी राखणे अपेक्षित आहे.- दादाराव डाेल्हारकर मुख्याधिकारी यवतमाळ