वडकी (यवतमाळ) : पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचण्यात आला. संबंधित वाहन थांबविले. पाहतात तर काय त्यामध्ये चार-पाच नव्हे तब्बल ३० रेडे होते. वडकी पोलिसांनी कंटेनरमधून वाहतूक होत असलेल्या या रेड्यांना जीवदान दिले.
राष्ट्रीय महामार्गावरील बोरी इचोड गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कंटेनर चालक नाझिम शहीद (४५, रा. मुजफ्फरनगर उतरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.नागपूर ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वडकीचे ठाणेदार विजय महाले यांना मिळाली.
पोलिसांनी लगेच बोरी इचोड येथे सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपूरकडून येणारा आरजे१४ -जीएल ३३३९ क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यात कोंबून भरण्यात आलेले तब्बल ३० हेले (रेडा) आढळून आले. या प्रकरणी कंटेनर चालकाला वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
४७ लाखांचा मुद्देमाल जप्तवडकी पोलिसांनी ३० जनावरांसह ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये कंटेनरचाही समावेश आहे. या जनावरांना गोरक्षणच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय महाले, पोलिस जमादार विनोद नागरगोजे, नीलेश वाढई, विलास जाधव, विकेश धावर्तीवार आदींनी पार पाडली.