यवतमाळ : परवानाधारक दारू दुकानाविरोधात केलेली तक्रार मागे घेेण्यासाठी नगरपंचायत नगरसेवकाने ९० हजारांची लाच स्वीकारली. ही लाच घेताना एसीबीच्या पथकाने नगरसेवकाला रंगेहात बुधवारी दुपारी अटक केली. मारेगाव येथे ही कारवाई करण्यात आली.
अनिल उत्तमराव गेडाम (४५, रा. मारेगाव) असे लाच स्वीकारणाऱ्या नगरसेवकाचे नाव आहे. गेडाम हे प्रभाग क्र.१३ मधून नगरपंचायतीत प्रतिनिधित्व करतात. त्यांनी परवानाधारक किरकोळ देशीदारू दुकानाविरूद्ध तक्रार केली. ही तक्रार मागे घेण्यासाठी संबंधिताला पैशांची मागणी केली. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. १० जानेवारी रोजी एसीबीने या लाचेच्या मागणीची पडताळणी केली. नंतर बुधवार, १८ जानेवारीला सापळा रचला. एसीबी पथकासमक्षच आरोपी नगरसेवकाने ९० हजार रुपयांची लाच तक्रारदारांकडून स्वीकारली. त्यानंतर एसीबीने या नगरसेवकाला तत्काळ अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अपर अधीक्षक अरुण सावंत, देवीदास घेवारे, उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विनायक कारेगावकर, ज्ञानेश्वर नालट, जमादार अब्दुल वसीम, महेश वाकोडे, सचिन भोयर, सुधीर कांबळे, राहुल गेडाम यांनी केली.