लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तपासणीत हयगय केल्याने दिव्यांग अपत्य जन्माला आले. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून ग्राहक आयोगाने यवतमाळ येथील दोन डॉक्टरांना ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. यात एक स्त्रीरोग तज्ज्ञ आणि एका सोनोग्राफी तज्ज्ञाचा समावेश आहे. आर्णी येथील श्रीकांत वसंतराव राठोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर २० सप्टेंबर रोजी हा निर्णय देण्यात आला आहे.
श्रीकांत राठोड यांच्या पत्नी मनीषा श्रीकांत राठोड (रा. आर्णी) या गर्भवती असताना येथील डॉ. अर्चना वीरेंद्र राठोड यांच्याकडे उपचार घेत होत्या. डॉ. राठोड यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी येथील डॉ. आशिषकुमार लोहिया यांच्या मंगलमूर्ती डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी केली. त्यावेळी मनीषा यांच्या पोटातील गर्भ सुस्थितीत असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यंग नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रत्यक्षात मात्र प्रसूतीनंतर नवजात बाळाला दोन्ही हाताला प्रत्येकी चार बोटं होती. पायाला हाड नव्हते, तर पाय व पायाची बोटही व्यवस्थित नव्हती. डॉ. अर्चना राठोड व डॉ. लोहिया यांनी तक्रारकर्ते श्रीकांत राठोड यांना प्रत्येकी २० लाख रुपये अशी एकूण ४० लाख रुपये भरपाई द्यावी, प्रत्येकी दहा हजार आणि तक्रार खर्चाचे तीन हजार द्यावे, असा आदेश दिला आहे.
तपासणीत हयगय डॉक्टर आणि सोनोग्राफी तज्ज्ञांची तपासणीत हयगय झाल्याने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी श्रीकांत राठोड यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये डॉ. अर्चना राठोड आणि डॉ. आशिषकुमार लोहिया यांनी उपचार आणि तपासणीत केलेली हयगय स्पष्ट झाल्याने आयोगाने निर्णय दिला.