यवतमाळ : येथील जिल्हा न्यायालयाच्या परिसरात मद्यधुंद युवकाने शनिवारी सायंकाळी राडा घालत एका महिला वकिलावर हात घातला. हा प्रकार पाहून परिसरातील वकील मंडळी धावून आली. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने आरडाओरड करीत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. वकिलांनी त्याला पकडून शहर पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी महिला वकिलाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
विप्लव दिलीप इंगळे (२६ ) रा. कोल्हे ले-आऊट भाग २ असे या तरुणाचे नाव आहे. तो दारूच्या नशेत न्यायालयात पोहोचला. त्याने महिला वकिलाशी झटापट करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या महिला वकिलाने आरडाओरडा करून मदत मागितली. त्यावेळी परिसरातील उपस्थित वकील येथे धावून आले. यावेळी तो तरुण महिला वकिलाबद्दल अर्वाच्य भाषेत बोलत होता. त्याने आपण हिचा प्रियकर आहो असे सांगण्यास सुरुवात केली. मात्र या सर्व प्रकारामुळे महिला वकील प्रचंड घाबरली होती.
तिला धीर देत इतर वकिलांनी मद्यधुंद तरुणाला पकडले व शहर पोलिसात आणले. तेथे महिला वकिलाने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी विप्लव इंगळे याच्या विरोधात ३५४, ३५४ ड, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.