यवतमाळ : शेताकडे निघालेल्या शेतकऱ्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला. यात संबंधित शेतकरी गंभीर जखमी झाला. त्यांचे संपूर्ण शरीर रानडुकराने अक्षरश: जागोजागी फाडून टाकले. ही घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आमडी शिवारात घडली.
मधुकर भुराजी बावणे (वय ६४, रा. आमडी) असे या घटनेत जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी शेताकडे निघाले होते. दरम्यान, पंडितराव डंभारे यांच्या शेतालगतच अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. मधुकर बावणे यांनी प्रतिकार केला. मात्र, रानडुकराने त्यांच्या शरीराचे अक्षरश: लचके तोडले. मान, छाती, पोट, पायावर गंभीररीत्या चावा घेतलेला आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर रानडुक्क़र पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत बावणे यांना रुग्णालयात नेण्यात आले. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रानडुकराचा त्रास सुरू आहे. त्यामुळे शेतकरी दहशतीत आहेत.