मारेगाव (यवतमाळ) : तालुक्यातील सालेभट्टी परिसरातील फिस्कीच्या जंगलाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली, तर वन्यजीव सैरभैर झाले. आग विझविण्याच्या प्रयत्नात एक वनपाल जखमी झाला. त्याला उपचारासाठी वणीत हलविण्यात आले. चार तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली.
दुपारी १ वाजताच्या सुमारास सालेभट्टी परिसरातील फिस्कीच्या जंगलातून धुराचे लोळ आकाशात झेपावत असल्याचे काहींना दिसून आले. लगेच याची माहिती वन विभागाला देण्यात आली. दुपारी २ वाजताच्या सुमारास आरएफओ विक्रांत खाडे यांच्या नेतृत्वात वन विभाग कर्मचाऱ्यांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वणी व पांढरकवडा येथील पालिकेच्या अग्नीशमन दलाला आगीची माहिती दिली; परंतु चार तासानंतर अग्निशमन दलाचा एकही बंब घटनास्थळी पोहोचला नाही. वन कर्मचाऱ्यांनी सहा फायर ब्लोअर मशीनच्या सहाय्याने चार तास अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. आग विझविण्याच्या प्रयत्नात वनपाल प्रफुल्ल क्षीरसागर यांचे दोन्ही हात भाजल्या गेले. त्यांना उपचारासाठी वणी येथे पाठविण्यात आले.
आगीत सागवानासह मौल्यवान वृक्षांची राखरांगोळी
मागील वर्षी या जंगलात वन विभागाने सागवान, बांबू, शिवनसाग, खैर, चिंच आदी झाडांची लागवड केली होती; मात्र या आगीत या झाडांची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाली. या जंगलात वाघ, मोर, हरीण, निलगाय, ससा यासह विविध वन्यजीवांचा अधिवास आहे; मात्र या आगीमुळे हे वन्यजीव सैरभैर झाले असून, त्यांनी या जंगलातून आपला डेरा इतरत्र हलविला आहे.