यवतमाळ : मध्य प्रदेशातील बैलूत येथून २५ टन साखर घेऊन निघालेल्या ट्रकचा चोरट्यांनी पाठलाग करून त्यास यवतमाळ शहराजवळील करळगाव घाटात अजविला. त्या चोरट्यांनी चालक-वाहकाला मारहाण केली व ट्रक घेऊन ते पळून गेले. हा थरार सोमवारी पहाटे ४ वाजता घडला. दरोडेखोरांच्या तावडीतून पळालेल्या चालकाने पोलिस ठाणे गाठून आपबीती कथन केली.
मध्यप्रदेशमधील बैतूल सुहापूर येथून एमपी ४८-एच ०७८८ क्रमांकाचा ट्रक २५ टन साखर घेऊन यवतमाळकडे निघाला. रविवारी सायंकाळी हा ट्रक यवतमाळकडे मार्गस्थ झाला. चालक योगेश रघुवंशी ठाकूर (रा. मोरखा, मध्य प्रदेश) ट्रक घेऊन यवतमाळ शहराजवळ पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत वाहक म्हणून दुर्गेश चिंध्या ढोमणे (रा. चिखलीकला, मध्य प्रदेश) होता. करळगाव घाटातील देवीचे मंदिर पार करून साखर असलेला ट्रक हळूहळू वर चढू लागला. एका वळणावर मागून आलेली कार सरळ ट्रकला आडवी लावली. नाईलाजाने ट्रक चालकाला ट्रक थांबवावा लागला.
पाऊस सुरू असतानाच लुटारूंची टोळी कारमधून उतरली. चाकूचा धाक दाखवित त्यांनी चालक व वाहकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत योगेश ठाकूर हा झटका मारून अंधारात पळून गेला. त्यानंतर वाहक दुर्गेश ढोमणे याला डोळ्यावर पट्टी बांधून लुटारूंनी कारमध्ये बसविले. तिघेजण कारमध्ये होते, तर उर्वरित चारजण ट्रकमध्ये चढले. त्यांनी तो ट्रक ताब्यात घेऊन परस्पर पुढे पसार केला. या धक्क्यातून सावरत चालक योगेश ठाकूर पायदळ यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात पोहोचला. त्याने लूटमार झाल्याची हकीकत सांगितली. त्यानंतर सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाहक दुर्गेश ढोमणे शहर पोलिस ठाण्यात पोहोचला.
दरोडेखोरांनी ट्रकच पळविला हे माहीत होताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही कामाला लागले. तक्रार घेऊन आलेल्या चालक व वाहकांकडून विविध पद्धतीने घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. यासोबतच ट्रकचा शोध घेण्यासाठी पथकांना रवाना करण्यात आले आहे.
वाहकाला सोडले वणी मार्गावर
ट्रक लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या एका पथकाने वाहक दुर्गेश ढोमणे याला कारमध्ये डांबून नेले. त्याला वणी मार्गावर यवतमाळ शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर सोडले. चाकूचा धाक दाखवित आरोपींकडून त्याला धमकावण्यात आले होते.
दरोडेखोरांचे संभाषण हिंदी-मराठीत
सात दरोडेखोरांमध्ये संभाषण हिंदी व मराठी या दोन्ही भाषेत सुरू होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्यांनी वाहकाला वणी मार्गावर सोडले. फोनवर बोलताना सुद्धा ट्रक वणीच्या दिशेने घेऊन या, असे सांगण्यात आले होते. या सर्व बाबींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, तपास सुरू आहे.