यवतमाळ : मुंबईत ओएनजीसी कंपनीत नोकरीवर असणाऱ्या मुलाने स्वत:च्या समाजातील सुशिक्षित मुलीशी जीवनसाथीवरून ओळख केली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, कुटुंबाच्या संमतीने दोघांचे लग्न ठरले. मुलीला प्रीवेडिंग शूटिंगसाठी गोवा येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दिवाळीच्या सुटीत यवतमाळात आल्यानंतरही मुलीवर अत्याचार केला. नंतर लग्नाला स्पष्ट नकार देत, तुमचे कुटुंब गरीब आहे, असे म्हणत फसवणूक केली. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अभिषेक रमेश कुडमेथे (३१, रा. सहयोग गृहनिर्माण सोसायटी वाघापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची जीवनसाथी डॉट कॉमवरून पीडित मुलीशी ओळख झाली. नंतर दोघांमध्ये मोबाइलवरून संभाषण सुरू झाले. त्या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मुंबईत राहणारा अभिषेक प्रेयसीला भेटण्यासाठी यवतमाळात येत होता. २६ जून रोजी अभिषेक व पीडिताने प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनीही दोघांचे लग्न लावून देण्याचे मान्य केले. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी अभिषेकने पीडितेला गोवा येथे बोलविले. तिथे तिच्या सोबत प्रीवेडिंग शूटिंग केले. नंतर हॉटेलमध्येच तिच्यावर अत्याचार केला. लग्नच ठरल्याने पीडितेनेही नकार दिला नाही. यानंतर दिवाळीच्या सुटीत २६ ऑक्टोबर रोजी अभिषेक यवतमाळात आला. तेव्हा त्याने पीडितेला त्याच्या कारमध्ये बसवून गोधनी मार्गावर नेले. तिथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे पीडितेने अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी कलम ६९, ३५१ (२) भारतीय न्याय संहितेप्रमाणे अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.