यवतमाळ : एस.टी. महामंडळाच्या बसेस भंगारात काढण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. मात्र, तरीही त्याचा वापर होत असल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. असाच प्रकार गुरुवारी दुपारी ४.३० वाजता अमरावती मार्गावर घडला. भरधाव शिवशाहीची डिझेल टँक तुटून रस्त्यावर घरंगळू लागली. हा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
बडनेरा डेपोचे एमएच-०९ईएम-२२६० क्रमांकाची शिवशाही अमरावतीसाठी निघाली. या बसमध्ये ५० प्रवासी बसले होते. अचानकच बसचा आवाज येऊ लागला. काय प्रकार आहे, हे लक्षात येण्यापूर्वीच काही अंतरापर्यंत डिझेल टँक रस्त्यावर अक्षरश: घासत गेली. वेळीच चालकाने बस उभी केली. प्रवासी खाली उतरले. त्यांना दृश्य पाहून धक्काच बसला. बसची डिझेल असलेली टँक अक्षरश: निखळून पडली होती. आदळत असताना ती फुटली असती व घर्षणाने पेट घेतला असता तर मोठी दुर्दैवी घटना घडली असती. प्रवाशांनी शिवशाहीची अवस्था पाहून आपला संताप व्यक्त केला. थोडक्यात बचावलो, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.
बस पेटण्याच्या घटना वारंवार
बस पेटण्याच्या घटना वारंवार घडत आहे. पुणे येथे यवतमाळातील शिवशाहीने पेट घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे. खासगी ट्रॅव्हल्सनेही पेट घेतला. त्यात १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला तरीही बसेसच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. प्रवाशांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेकजे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याने या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.