बाभूळगाव/घारफळ (यवतमाळ) : रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळी एरणगाव परिसरात घारफळ ते किन्ही दरम्यान हा प्रकार आढळून आला. वनविभागाने शवचिकित्सा करून बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.
गणेश बबनराव तरोडकर यांच्या शेताजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची वार्ता पसरताच घटनास्थळी परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दिनेश मुरापुरे हे शेतात तुरीच्या शेंगा आणण्यासाठी गेले होते. रस्त्यालगत दुर्गंधी व माशा घोंघावत असल्याचे त्यांना आढळले. पाहणी केली असता नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पाटील अर्चना गावंडे यांनी वनविभागाला कळविले. वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम, सहायक वनसंरक्षक संदीप गिरी, वनरक्षक आशिष देशमुख, यवतमाळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कोल्हे, बाभूळगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, डॉ. झैझाड (अमरावती), यवतमाळ येथील कोब्रा ॲडव्हेंचरचे श्याम जोशी यांच्यासह सागर त्रिवेदी, ओम शिंदे, सागर हिवरकर, पोलिस निरीक्षक सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळीच शवविच्छेदन करून पालोती येथे वनविभागाच्या हद्दीत बिबट्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.