यवतमाळ : शेतात शेंगा तोडण्यासाठी गेलेली महिला दहा दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर १० डिसेंबर रोजी तिचा मृतदेह शेतातील उसामध्ये आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता महिलेच्या दिरालाच बेड्या ठोकल्या आहेत. एक एकर शेतीच्या विक्रीमध्ये वहिनी आडकाठी घालत असल्याने तिचा गळा आवळून खून केल्याचे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतातील उसामध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासातून पुढे आला आहे.
यवतमाळ तालुक्यातील मंगरुळ येथील साधना संजय जोगे ही महिला ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास गावशिवारातील स्वमालकीच्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेली होती. मात्र रात्री उशिरा ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशीही शोध घेतला. मात्र, थांगपत्ता न लागल्याने १ डिसेंबर रोजी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान, गाव शिवारातीलच राजू खराटे यांच्या शेतातील उसात कचरा तसेच काचकुयऱ्या वाढल्या असल्याने मजुरांनी ऊस तोडण्यास नकार दिला. कचरा पेटविल्याशिवाय ऊस तोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे सकाळी ११ च्या सुमारास ऊस पेटविण्यात आला. त्यावेळी उसामध्ये कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. याची माहिती मिळाल्यानंतर बेपत्ता असलेल्या महिलेच्या कुटुंबातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.
पेटलेल्या उसामुळे मृत महिलेच्या अंगावरील कपडे जळाले होते. मात्र, तोरड्या व जोडव्यावरून सदर मृतदेह साधना जोगे यांचाच असल्याची ओळख पटली. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पती संजय जाेगे यांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने साधनाचा मृत्यू नेमका कसा झाला हे शोधण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर उभे होते. अखेर दिरानेच वहिनीला संपविल्याचे पुढे आले. या प्रकरणी पोलिसांनी नाना उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे (३०) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. एक एकर शेती विक्रीमध्ये वहिनी अडथळा आणत असल्याने गळा आवळून ठार मारल्याचे व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत बाजूच्या खराटे यांच्या शेतातील उसात फेकल्याची कबुली आरोपी नाना जाेगे याने दिली असल्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांनी सांगितले.