यवतमाळ : नेताजीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्याला संशयावरून एका कुख्यात आरोपीने धारदार चाकूने वार करून ठार केले. ही भीषण घटना रविवारी रात्री ९.४५ वाजता घडली. या प्रकरणी लोहारा पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. वर्षभरासाठी तडीपार केलेला आरोपी शहरात ठाण मांडून होता. त्याच्याकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली, अशी तक्रारही संबंधिताने पोलिसांकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्षच केल्यामुळे खुनाची घटना घडली.
हेमंत कांबळे (४१) रा. नेताजीनगर असे मृताचे नाव आहे. हेमंत हा कुणालाही मदत करण्यासाठी धावून जात होता. त्याचा हा स्वभाव त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. परिसरातील एका विधवेला शासकीय योजनेतून कामगाराची पेटी मिळवून देणे त्याच्या अंगलट आले. विधवेला मदत केल्यामुळे तिचा दीर कुख्यात आरोपी श्याम सुभाष जोगदंड (२८) हा हेमंत कांबळे यांच्यावर संशय घेऊ लागला. याला इतरांनीही खतपाणी घातले. यात प्रकरण शिवीगाळ व धमकी देण्यापर्यंत पोहोचले. श्याम जोगदंड याने त्याच्या वहिनीच्या मोबाईलवरून हेमंत कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात हेमंत कांबळे २७ मे रोजी लोहारा पोलिस ठाण्यात पोहोचले. तेथे त्याने तडीपार आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचे सांगितले.
याबाबत आम्ही कारवाई करू तुम्ही निश्चींत रहा, असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. तडीपार आरोपी गावात फिरत असतानाही त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही. या उलट त्या आरोपीने हेमंत कांबळे यांच्यावर पाळत ठेऊन २ जून रोजी रात्री धारदार चाकूने हल्ला केला. त्यांच्या पोटात, मांडीवर व कंबरेच्या खाली चाकूने वार केले. ही घटना रंभाजीनगर येथे पीपल्स शाळेमागे घडली. जखमी हेमंत कांबळे यांनी फोन करून पत्नी नीता हिला घटना सांगितली. नीता यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमी पतीला ऑटोतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र हेमंत कांबळे यांची प्रकृती अतिरक्तस्त्राव झाल्याने खालावत गेली व त्यांचा रात्री उशिरा मृत्यू झाला. या प्रकरणी नीता हेमंत कांबळे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून श्याम सुभाष जोगदंड व त्याचा साथीदार अशा दोघांवर लोहारा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.