यवतमाळ : शनिवारी शहीददिनी यवतमाळ येथील बाबूजींची समाधी असलेल्या प्रेरणास्थळावर अनोख्या पद्धतीने शहीद भगतसिंग यांना अभिवादन करण्यात आले. भगतसिंग यांचे जन्मस्थळ असलेल्या पंजाबमधील खटकर कलान येथून आणलेल्या पवित्र मातीत येथील माती मिसळून ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्रामसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या समाधीस्थळावरील उद्यानात बाबूजींच्या कांस्य प्रतिमेच्या मागे रुद्राक्षाचे झाड लावण्यात आले.
बाबूजी तारुणावस्थेत असताना त्यांना शहीद भगतसिंग यांचे विशेष आकर्षण होते. भगतसिंग यांच्या प्रतिमेच्या खाली बाबूजींनी ‘जिओ तो शेर की तरह, नही तो मौत की गोद में सो जाओ’ असे लिहून ठेवले होते. त्यामुळेच शहीद भगतसिंग यांच्या जन्मगावी असलेल्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेण्याची ओढ डॉ. विजय दर्डा यांना लागली होती. त्यानुसार, पंजाबमधील फागवाडा रोपर राष्ट्रीय महामार्गावरील खटकर कलान या भगतसिंग यांच्या जन्मगावी ते खास दर्शनासाठी गेले होते. येताना समाधीस्थळ परिसरातील पवित्र माती घेऊन आले. याच मातीत येथील माती मिसळून त्यामध्ये धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि पवित्र मानले जाणारे रुद्राक्षाचे झाड लावले. यावेळी शहीद भगतसिंग यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.
शहीददिनी झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी ‘लोकमत’ एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार डाॅ. विजय दर्डा यांच्यासह ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, जळगावचे माजी महापौर रमेशदादा जैन, माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.