महागाव (यवतमाळ) : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने येथे शुक्रवारी सरकारची प्रेतयात्रा काढण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील नवीन बसस्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
या प्रेतयात्रेला तालुक्यातून सकल मराठा कुणबी समाज बांधव मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने जमले होते. सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा निघाली तेव्हा तिरडीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते. प्रेतयात्रेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे यांच्या उपोषणादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. रात्रीपासूनच पाऊस सुरू असताना सकाळी पावसाने थोडी उसंत दिली होती. तेवढ्याच वेळात प्रचंड गर्दी जमा झाली. सरकारच्या प्रेत यात्रेचे आव्हान सकल मराठा कुणबी समाजाच्या वतीने करण्यात आले होते. शुक्रवार आठवडी बाजार असल्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात समाजबांधव एकत्र जमले होते.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रमोद भरवाडे, साहेबराव पाटील कदम, तेजस नरवाडे पाटील, प्रवीण ठाकरे पाटील, महेंद्र कावळे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस मागासवर्गीय विभाग, गोविंदराव देशमुख अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), नितीन नरवाडे पाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पायी निघालेल्या सरकारच्या प्रतीकात्मक प्रेतयात्रेचा समारोप पोलीस ठाण्यात करण्यात आला. मोर्चामध्ये सुनील नरवाडे, संजय कोपरकर, शैलेश सुरोशे, अमोल शिंदे, उदय कुमार नरवाडे, प्रवीण नरवाडे, ओम देशमुख, डॉ. संदीप कदम, स्वप्निल अडकिने, समाधान राऊत, अमर नरवाडे यांच्यासह शेकडो समाज बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते. प्रेतयात्रा शांततेत पार पडली. यावेळी महागावचे ठाणेदार सोमनाथ जाधव, दीपक ढोमणे पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.