वणी (यवतमाळ) : येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सुविधा कापड केंद्र नामक प्रतिष्ठानात शिरलेल्या चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातून १० लाख रुपयांची रोकड पळविली. हा चोरटा एवढ्यावरच थांबला नाही, तर जाताना दुकानाला त्याने आग लावली. यात अंदाजे दोन कोटींच्या नुकसानीचा अंदाज आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. सायंकाळी याप्रकरणी तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
सोमवारी रात्री दुकान बंद होण्याअगोदर ग्राहक बनून हा चोरटा दुकानात शिरला. तेथेच तो लपून बसला. दुकान बंद झाल्यानंतर पहाटे २ दोन वाजेच्या सुमारास त्याने हे कृत्य केले असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. पळून जाण्यापूर्वी चोरट्याने पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावरील दुकान पेटवून दिल्याचे सांगण्यात आले. काही वेळानंतर आगीचे लोळ बाहेर पडू लागले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच, दुकानाचे संचालक असलेल्या गुंडावार बंधूंना याबाबत माहिती देण्यात आली. सूचना मिळताच अग्निशमन दल व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या दुकानात १० ते १२ कोटी रुपयांचा माल ठेवलेला होता. आगीत अंदाजे दीड ते दोन कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला. वणी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. घटनास्थळाला वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राकेश खुराणा यांनी भेट देऊन पाहणी केली.
कापडाची दोरी करून उतरला तीन माळे?
तीन माळे असलेल्या या दुकानाच्या दोन माळ्याच्या शटरला बाहेरून कुलूप होते, तर तिसऱ्या माळ्यावरील शटरला आतून कुलूप होते. चोरट्याने दुकानातीलच शर्टाचे लांब कापड घेऊन त्याची दोरी बनवली. त्यानंतर तिसऱ्या माळ्यावरील शटरचे कुलूप तोडून चोरटा बाहेर पडला व कापडापासून तयार केलेल्या दोरीच्या साहाय्याने तीन माळे खाली उतरून तो पळून गेला, असा प्राथमिक अंदाज दुकानाच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.
श्वान पथक घुटमळले
घटनेनंतर मंगळवारी दुपारी यवतमाळ येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटे वणी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे श्वानपथक घटनास्थळावरच घुटमळले.