किशोर वंजारी
नेर (यवतमाळ) :चोरटे तसे चतुरच असतात. पण कधी-कधी त्यांच्याही चातुर्याला प्रलोभनाची भुरळ पडते अन् तेही अलगद पोलिसांच्या तावडीत सापडतात. शहरात बुधवारी रात्री असाच एक चोरटा चक्क फुकटच्या दारूला भुलला. त्याने बीयरबारमध्ये चोरी केली. तेथे केवळ २६०० रुपये हाती लागल्यावर त्याने मनसोक्त दारू ढोसली. व्हायचे तेच झाले. दारूच्या धुंदीने चोर डाराडूर झोपला अन् सकाळी अलगद नागरिकांच्या तावडीत सापडला. मग काय विचारता? सर्वांनी मिळून धो-धो धुतला अन् आदमुसा झालेल्या चोराला पोलिसांच्या तावडीत दिला. गुरुवारी दिवसभर नेर शहरात याच घटनेची चर्चा होती.
हा सारा प्रकार बुधवारी रात्री येथील अमरावती रोडवरील एका बीयरबारमध्ये घडला. तेजेस पंडित गणवीर (२०) रा. नबाबपूर असे या आरोपीचे नाव आहे. बुधवारी रात्री बारा वाजता त्याने जुन्या बसस्थानकावरील राज वाईनबारमध्ये काच फोडून चोरी केली. गल्ल्यातील नगदी २६०० रुपये त्याच्या हाती लागले. त्यानंतर त्याने सहा दारू बाॅटलही चोरल्या. पण समोर दारूची रास बघून त्याने तेथेच दारू ढोसली. दारूची झिंग इतकी भारी आली की, तो तेथेच झोपला. सकाळी बीयरबारचे मालक सुदीप अशोक जयस्वाल हे दुकानात आले. त्यावेळी त्यांना बीयरबारच्या काचा फुटलेल्या दिसल्याने चोरीची शंका आली. आत जाऊन पाहतात तर चक्क चोरटाच तेथे झोपलेला होता.
मालकाला बघून तो पळ काढण्याच्या तयारीत होता. परंतु मालकाने आरडाओरड केल्याने नागरिक गोळा झाले आणि त्यांनी चोरट्याला जागेवरच चोपला. धुलाई केल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. जमादार सुभाष ठाकरे, नीलेश सिरसाट, सचिन फुंडे यांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून तेजेस पंडितवर भादंवी ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
११ जुगाऱ्यांना रंगेहात अटक
महागाव तालुक्यातील सवना येथे एका घरी जुगार अड्डा सुरू होता. त्यावर धाड टाकून पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली.
सुनील बारस्कर (३३), सय्यद रहीम सय्यद इब्राहीम (३५), दत्ता जाटवा (३८), विजय दत्तराव माने (४२), संतोष मनवरे (४६), गोपाल मेहलडे (३८), सचिन जांभूळकर (३२), पंडित पवार (३५), शंकर दासरकर (५२), माधव मेंढके (५१) आणि धम्मपाल खाडे (४२) सर्व रा. सवना अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व सवना येथील वाॅर्ड क्र. ४ मधील एका घरी एका-बादशाह नावाचा जुगार खेळत होते. गोपनीय माहितीवरून ठाणेदार संजय खंडारे, एपीआय पाटील यांच्या पथकाने छापा मारला. घटनास्थळावरून रोख सहा हजार ६५० रुपयांसह ३७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.