यवतमाळ : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळातील ८५ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकार सवलत मूल्याचे २२० कोटी, सोबतच अतिरिक्त १०० कोटी रुपये दरमहा एसटी महामंडळाच्या खात्यात जमा करणार असल्याची विश्वसनीय सूत्राची माहिती आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या ७ तारखेलाच त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून विविध २९ प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या प्रवास सवलतीची रक्कम सरकारकडून महामंडळाला दिली जाते. यापोटी दरमहा सुमारे २०० कोटी एवढी रक्कम सरकारकडे थकीत राहते.
वेतनासाठी दरमहा ३६० कोटी
महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहा ३६० कोटी रुपये लागतात. सरकारकडून ३०० कोटी रुपये मिळतील. त्यामुळे ६० कोटींची तूट पडणार आहे. ही रक्कम महामंडळाला जुळवावी लागणार आहे.
महिन्याच्या ३० तारखेला मिळणार रक्कम
उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याला उशिराने होत आहे. याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये ओरड सुरू आहे. हा प्रश्न मिटविण्याच्या दृष्टीनेच राज्य सरकारने दरमहा सवलत मूल्याची रक्कम अदा करण्याचा मार्ग काढला असल्याचे सांगितले जाते. २२० कोटी रुपये सवलत मूल्यासोबतच अतिरिक्त १०० कोटी रुपयेसुद्धा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या ३० तारखेला ही रक्कम एसटी महामंडळाच्या खात्यात जमा करण्याची तरतूदही केली जाणार असल्याची माहिती आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित व्हावे यासाठी सरकारने घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. महामंडळ अधिक सक्षम व्हावे याकरिता नवीन बसेसच्या दृष्टीने निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस