लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : गोवंशीय जनावरांच्या मांसाने भरलेला ट्रक पांढरकवडा पोलिसांनी पकडला. या कारवाईत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमधील मांसाची किंमत २४ लाखांच्या जवळपास असून, ही कारवाई रविवारी (दि. ११) पहाटे ३.३० वाजेदरम्यान करण्यात आली.
रविवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास नागपूर मार्गाने आदिलाबादकडे एक ट्रक (क्र. एमएच ४० बीसी ८४४२) मध्ये गोवंशीय जनावरांचे मांस घेऊन आदिलाबादकडे जात असल्याची गोपनीय माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. माहितीवरून सहायक पोलिस निरीक्षक दिनेश झांबरे, आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर यांनी त्यांच्या पथकासह आदिलाबादकडे जाणाऱ्या बाजूने गोंडवाकडी रस्त्यावर नाकाबंदी केली. नाकेबंदीदरम्यान ट्रक (क्र. एमएच ४० बीएल ८४९२) येताना दिसला. शंका आल्याने ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या बॉडीमध्ये वरून एक हिरव्या रंगाची ताडपत्री झाकलेली व एका पांढऱ्या रंगाच्या पॉलिथीनच्या अखंड कापडात बर्फ टाकून कापलेल्या बैल व म्हशीचे मांस दिसून आले.
या कारवाईत पोलिसांनी ४० लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शाहनवाज शेख मेहबूब, समीर खान व गणेश असोले या तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे, पोलिस निरीक्षक दिनेश झांबरे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक नितीन सुशीर, पोलिस हवालदार प्रमोद जुणूनकर, मारोती पाटील, सचिन काकडे, राजू बेलयवार, छंदक मनवर, राजू मुत्यालवार, गौरव नागलकर यांनी पार पाडली. राष्ट्रीय महामार्गावर तपासणी होत असल्याने अंतर्गत रस्त्यांचा वापर करून जनावर तस्करी व गोमांस तेलंगणामध्ये नेले जात आहे. कारवाईतून हा प्रकार वारंवार उघड होत आहे.
हैदराबाद येथे जात होता ट्रकट्रकमधील शेख शाहनवाज शेख मेहबूब (४५, रा. गांधी स्कूलजवळ, भाजीमंडी, कामठी, ता. कामठी, जि. नागपूर) याला मांस वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. ट्रकमधील मांस कुठून आणले व कुठे घेऊन जात आहे, अशी विचारणा केली असता, ट्रकमधील मांस हे समीर खान (३२, रा. कामठी, जि. नागपूर) याच्या मालकीचे आहे. हा माल नागपूर येथून हैदराबाद येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. घाटंजी येथील गणेश आसोले (३४) हा वडकी ते महाराष्ट्र बॉर्डरपर्यंत पोलिसांच्या पेट्रोलिंग वाहनावर लक्ष ठेवून गाडी सुरक्षित पास करून देतो, असे सांगितले.