विलास गावंडे, महागाव (यवतमाळ): चिलगव्हाण (ता.महागाव) येथील साहेबराव पाटील करपे या वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने १९ मार्च १९८६ रोजी पत्नी आणि मुलाबाळांसह विषाचा घोट घेत मरण कवटाळले. मागील ३७ वर्षात महाराष्ट्रात साडेचार लाख शेतकऱ्यांना आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेण्यास व्यवस्थेने भाग पाडले. साहेबराव करपे आणि कुटुंबाच्या पहिल्या शेतकरी आत्महत्येचे स्मरण आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून आज महागावात शेतकरी पुत्रांनी सामूहिक अन्नत्याग करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना प्रकट केली.या अन्नत्याग आंदोलनात राजकीय, सामाजिक क्षेत्रासह प्रशासकीय यंत्रणाही सहभागी झाली होती. साहेबराव करपे यांनी पत्नी व चार अबोध अपत्यांसह पवनार येथील आश्रमात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील या पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या काळीज पिळवटणाऱ्या घटनेची केवळ राज्यातच नाही तर देश पातळीवर नोंद झाली.एकाच शेतकरी कुटुंबातील ६ जणांच्या चीता चिलगव्हाणमधे पेटल्या. देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःसह कुटुंबाची आहुती दिली.
माजी आमदार विजयराव खडसे, उमरखेड पं.स.चे सभापती प्रज्ञानंद खडसे, नांदेडच्या माजी महापौर शीला भवरे, काँग्रेसचे नेते किशोर भवरे,राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रमोद जाधव,मराठा सेवा संघाचे उदय नरवाडे, डॉ.संदीप शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे सतीश खाडे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सवना येथे हनुमान मंदिराच्या सभागृहात अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.माजी आ. राजेंद्र नजरधने, नागोराव कदम,गोविंदराव देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रवीण ठाकरे, विठ्ठल गांवडे, प्रमोद जाधव, दतराव धांवडकर, आबासाहेब देशमुख,सखाराम देशमुख, गणेशराव देशमुख, गुलाब शिंदे,माजी जि.प. सदस्य शिवाजी देशमुख,मधुकर टेकाळे, मनोज गोरे,संध्या रणवीर, साहेबराव भोयर, गुणवंत देशमुख, शरद देशमुख, अमृतराव देशमुख,माजी सभापती नरेंद्र खंदारे,ओम देशमुख सहभागी झाले होते. चिलगव्हाण येथे साहेबराव पाटील करपे यांना श्रद्धांजली अर्पण करून दिवसभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.लक्ष्मण बोरकूट,रामेश्वर करपे, प्रमोद काळे, लक्ष्मण बोरकुट, दिलीप रावते, मारोतराव करपे, प्रकाश खंदारे, वैभव लांडे, सुधाकर काळे व गावकरी आंदोलनात सहभागी झाले होते. वाकद येथे मनीष जाधव यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन झाले.
कर्मचारीही सहभागी
३९ वर्षांपूर्वी सरकारी धोरणाला कंटाळून जीवनयात्रा संपविणाऱ्या शेतकरी कुटुंबाप्रती सहवेदना आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी महागाव येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महागाव तालुका पत्रकार संघ आणि शासकिय तथा निमशासकिय कर्मचारी संघटनांनी अन्नत्याग आंदोलन केले.यावेळी प्रशासनातील कर्मचाऱ्यांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतल्याचे दिसून आले.
राळेगाव येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग
राळेगाव, चिलगव्हाण येथील साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलींसह वर्धा येथे १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. शेतकऱ्याची सहकुटुंब आत्महत्येची महाराष्ट्रातील ही पहिली घटना होती. त्यानंतर शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. त्यामुळे १९ मार्च काळा दिवस पाळला जातो. या दिवशी शेतकऱ्यांच्या वतीने अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन राज्यभर केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक दिवस अन्नत्याग करून अन्नत्याग करण्यात आले. यावेळी जुनी पेन्शन आंदोलनातील शेतकरी पुत्रांनी सहभाग घेऊन साहेबराव चरपे कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राळेगाव नगरपंचायत बांधकाम सभापती मंगेश राऊत, नगरसेवक शशिकांत धुमाळ, राजू रोहनकर, महेश सोनेकर, शंकर माहुर्ले, सुरेश कुंभलकर, सूरज पारधी, मनीष काळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
काळ्या रांगोळ्या काढल्या, अन्नत्याग केला- साहेबराव करपे स्मृतिदिन: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली चर्चा
यवतमाळ येथील सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयात यवतमाळकर नागरिक, विद्यार्थ्यांनी रविवारी साहेबराव करपे स्मृतिदिनी काळ्या रांगोळ्या काढून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी चर्चा करून एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. १९ मार्च १९८६ या दिवशी चिलगव्हाण (ता.महागाव) येथील करपे शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली. या सहकुटुंब शेतकरी आत्महत्येच्या स्मृतिदिनी शेतकऱ्यांप्रती आपल्या संवेदना जाग्या व्हाव्या यासाठी राज्यभर ठिकठिकाणी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले जाते. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून यवतमाळ येथे अन्नत्याग आंदोलन पार पडले. यानिमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला धरून आणि शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काळ्या रांगोळ्यांच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. गायत्री जुमनाके, भारती पारशिवे, भावना घोगले, रेश्मा आसुटकर, राधा देशमुख, अश्विनी चव्हाण, जया मोहितकर, पूजा पवार, स्वराज मोडक, श्रीकांत कुंटलवार यांनी शेतकऱ्यांच्या वेदना रांगोळ्यांच्या माध्यमातून दर्शवल्या. अन्नत्याग आंदोलनात नागरिक, राजकीय मंडळी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अखेरीस पूजा पवार, अविनाश चंद्रवंशी, गायत्री जुमनाके, स्वराज मोडक, भारती पारशिवे या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपल्या कविता सादर केल्या.