वणी (यवतमाळ) : लोखंडी सळाखीचे बंडल पळविण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी गोडाऊनच्या बाहेर झोपून असलेल्या चौकीदाराची हत्या केली. त्यानंतर या चोरट्यांनी लोखंडी सळाखीचे चार बंडल लंपास केले. ही थरारक घटना रविवारी मध्यरात्रीनंतर वणी-यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्यालगत घडली. जीवन विठ्ठल झाडे (६०) असे मृताचे नाव असून तो राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील रहिवासी आहे.
वणी येथील सिमेंट व स्टीलचे व्यावसायिक सुरेश खिवंसरा यांचे वणी-यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्याजवळ गोडाऊन आहे. या गोडाऊनवर जीवन झाडे हा मागील १० वर्षांपासून चौकीदार म्हणून काम सांभाळत होता. तो त्याच्या पत्नीसह गोडाऊन परिसरात असलेल्या खोलीत वास्तव्याला होता. रविवारी त्याची पत्नी बाहेरगावी गेली होती. त्यामुळे जीवन एकटाच गोडाऊनमध्ये होता. रात्रीच्या सुमारास तो गोडाऊनबाहेर खाटेवर झोपून होता. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे तेथे पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम झोपून असलेल्या जीवनच्या डोक्यावर व पाठीवर लोखंडी वस्तूने प्रहार केला. यामुळे जीवन जागीच ठार झाला. त्यानंतर या चोरट्यांनी २४० किलो वजनाचे चार बंडल वाहनात टाकून तेथून पळ काढला. या चोरट्यांनी गोडाऊन परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड केली. सोमवारी सकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. सुरेश खिवंसरा यांचा दिवाणजी नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी गोडाऊनवर पोहोचला, तेव्हा त्याला जीवन झाडेचा मृतदेह दिसून आला. त्याने लगेच यासंदर्भात गोडाऊनचे मालक सुरेश खिवंसरा यांना माहिती दिली. खिवंसरा यांनी घटनेबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व जीवनचा मृतदेह विच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादंवि ३०२, ३९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेटघटनेची माहिती मिळताच, वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेराणी हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी करून आरोपींच्या शोधाबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.