यवतमाळ : शेतातील सोयाबीन चोरुन नेल्याचा संशय होता. यावरून तिघांनी एका युवकाला शेतात नेवून त्याचे हातपाय बांधले. त्याला काठीने बेदम मारहाण केली. गतप्राण झाल्यानंतर त्याला एका दुकानात आणून सोडले. ही घटना बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे रविवारी रात्री घडली.
मंगेश लक्ष्मण डेहणकर (३०) रा. मादणी असे मृताचे नाव आहे. मंगेशवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. यातूनच सोयाबीन चोरल्याचा संशय त्याच्यावर बळावला. आरोपी नीलेश गजानन जतकर (३२), सागर गजानन जतकर (३०), संतोष सुरेश चौधरी (२८) तिघे रा. मादणी यांनी मंगेशला पकडून शेतात नेले. सोयाबीन चोरीची कबुली दे, मुद्देमाल काढून दे असे म्हणत आरोपींनी मंगेशला मारहाण केली. या मारहाणीत मंगेश गंभीर जखमी होवून गतप्राण झाला. त्यानंतर आरोपीला त्या सोडून निघून गेले.
या प्रकरणी गजानन लक्ष्मण डेहणकर याच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी तीनही आरोपीविरुद्ध संगनमताने खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार रवींद्र जेधे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक मंगेश डांगे करीत आहे. खुनातील तीनही आरोपींना पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली.
शेतमाल चोरीच्या घटना वाढल्या
जिल्हाभरात शेतातून साहित्य चोरीचे प्रकार वाढले आहे. सोयाबीन, कापूस या नगदी पिकासोबतच कृषी वापरातील साहित्य सर्रास चोरीला जात आहे. यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. संशयातून गंभीर घटना होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक पोलीस शेतमाल चोरीच्या तक्रारीला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोेठे नुकसान होत आहे. निसर्गाची अवकृपा त्यातच चोरट्यांचा जाच यामुळे कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी अशा चोरट्यांचा बंदोबस्त करून निष्पाप शेतकरी आरोपी होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे.