१५ घरांची पडझड : ५० जनावरे जखमी, पाच गोठे कोसळलेनेर : मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळाचा तडाखा तालुक्यातील अडगाव, उमरठा, शिरसगाव आदी गावांना बसला. १५ घरांची पडझड झाली असून पाच गोठे पडल्याने ५० जनावरे जखमी झाली.पाऊस आणि जोरदार वारा यामुळे सदर तीनही गावातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळी ६ वाजतापासून सुसाट वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. याचा तडाखा बसलेल्या नागरिकांना इतर ठिकाणचा आसरा घ्यावा लागला. सर्वाधिक नुकसान उमरठा येथे झाले. या गावातील घरे आणि गोठ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. मोठमोठी वृक्ष उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. उडालेली टिनपत्रं आणि साहित्य आणताना त्यांची तारांबळ उडाली. कौलारू घरांचे छप्पर कोसळले. शिवाय या पावसामुळे सुकत चाललेल्या सोयाबीनचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पांढरी टेंभी, खोलापुरी या गावातील लोकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. तालुका प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पिंटू पाटील खोडे आदींनी केली. (तालुका प्रतिनिधी)
अडगाव, उमरठाला वादळाने झोडपले
By admin | Published: September 17, 2015 3:05 AM