कृष्णापूरला भेट : गावात आमिरच्या साधेपणाची चर्चा राजेश पुरी ढाणकी दगडी चिऱ्यांनी बांधलेला आणि लाकडी कोरीव काम असलेल्या खऱ्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारा कृष्णापूरच्या चिरेबंदी वाड्याने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याला भुरळ घातली. पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी उमरखेड तालुक्याच्या बंदीभागात आला असता ग्रामीण संस्कृती आमिरला चांगलीच भावली. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या पाहणीसाठी प्रसिद्ध अभिनेता आमिर खान बुधवारी उमरखेड तालुक्यातील एकंबा आणि कृष्णापूर येथे येऊन गेला. आमीरसारखा आंतरराष्ट्रीय किर्तीचा सिनेअभिनेता कृष्णापूरसारख्या लहानशा गावात आला आणि त्याने गावकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधला. ही बाब गावकऱ्यांसाठी अभिमानाची. दुसऱ्या दिवशीही आमिरच्या या भेटीचीच चर्चा ज्याच्या त्याच्या तोंडी होती. मात्र आम्मिर खानला भावला तो बंदीभागातील साधासुदा माणूस. श्रमावर विश्वास ठेवत जगण्याशी दोन हात करणारी कुटुंब. या सर्वात आमिर रमला असेल तर तो भास्कर पाटील कदम यांच्या जुन्या चिरेबंदी वाड्यात. आमिर खानचे गावात आगमन झाल्यानंतर कुठे थांबवावे, हा तसा प्रश्नच होता. त्यासाठी आमीरच्या टीमने गावातील पाच-सहा घरांची पाहणी केली. गावातील भास्करराव कदम यांचा जुना चिरेबंदी वाडा या टीमला पसंत पडला. आमीरला थांबण्यासाठी हा वाडा निश्चित करण्यात आला. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कृष्णापूर येथे आगमन झाले. थेट भास्करराव पाटील वाड्यात त्याला नेण्यात आले. ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडविणारा हा वाडा पाहून आमीरही चकीत झाला. दगडी चिऱ्यांनी बांधलेला हा वाडा लाकडी कोरीव काम आहे. या वाड्याच्या ओसरीत आमीर आणि त्याची पत्नी किरण राव काही काळ विसावले. त्या ठिकाणीच त्यांनी आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे आणि गावातील स्त्रियांशी संवाद साधला. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत गावाने भाग घेतला. सुरुवातीला प्रशिक्षण घेवून आलेल्या पाच लोकांव्यतिरिक्त कोणीच कामाला येत नव्हते. खरे हे पाच जण टवाळकीचा विषय झाले होते. परंतु हळुहळु जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व गावकऱ्यांना पटू लागले. पाहता पाहता संपूर्ण गाव जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदान करू लागले. कृष्णापूरच्या या कामाची दखल घेत थेट आमीर गावात आला आणि गावातील चिरेबंदी वाड्याने त्याला भूरळ पाडली. आमीर खान गावात येऊन गेला. साधेपणाने राहून गेला, याची गावकऱ्यांत सध्या चर्चा सुरू आहे. किरणला भावली पुडाची भाजी अभिनेता आमीर खान यांच्या पत्नी किरण राव यांना कृष्णापूर येथील पुडाची भाजी चांगलीच भावली. येथील नलावडे परिवाराच्या आग्रहास्तव आमीर आणि किरण यांनी आशीष नलावडे यांच्याकडे भाकर व पुडाची भाजीचा (बेसनाचा एक प्रकार) आस्वाद घेतला. किरणला पुडाची भाजी एवढी आवडली की तिने वर्षा नलावडे यांच्याकडून भाजी बनविण्याची रेसिपी विचारली. तसेच ती लिहूनही घेतली.
आमिरला चिरेबंदी वाड्याची भुरळ
By admin | Published: April 28, 2017 2:34 AM